सांगलीत काँग्रेस बंडाच्या भूमिकेत, काँग्रेस नेत्यांचे दिल्लीत ठाण; विशाल पाटील यांच्या उमेदवारीसाठी साकडे

सांगलीच्या जागेवरील दावा कुठल्याही परिस्थितीत सोडणार नाही, वेळ आली तर शिवसेना ठाकरे गटाला आव्हान देण्याची तयारी आहे, अशी भूमिका डॉ. विश्वजीत कदम यांनी मांडली आहे, त्यामुळे आता सांगलीत काँग्रेस बंडाची भमिका घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

  सांगली : अखेरच्या क्षणी मैत्रीपूर्ण लढत करायची झाली, तरी त्यासाठी तयारी आहे. पक्ष आदेश देईल, त्या पद्धतीने पुढे जाऊ. सांगलीच्या जागेवरील दावा कुठल्याही परिस्थितीत सोडणार नाही, वेळ आली तर शिवसेना ठाकरे गटाला आव्हान देण्याची तयारी आहे, अशी भूमिका डॉ. विश्वजीत कदम यांनी मांडली आहे, त्यामुळे आता सांगलीत काँग्रेस बंडाची भमिका घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

  दरम्यान महाविकास आघाडीच्या सांगली लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीचा पेच कायम आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून बुधवारी १७ उमेदवारांची यादी जाहीर झाली. त्यामध्ये सांगलीसाठी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या नावाचा समावेश आहे. यादीद्वारे चंद्रहार यांच्या घोषणेवर अधिकृत मोहोर उमटवली. दुसरीकडे या जागेवर काँग्रेसने हक्क सांगितला आहे.

  राज्यातील नेतृत्व या पेचावर तोडगा काढू शकले नाही. परिणामी, काँग्रेसच्या जिल्ह्यातील नेत्यांनी उमेदवारीचा वाद बुधवारी दिल्ली दरबारी पोहोचवला. श्रेष्ठींनी मंजुरी दिल्यास ठाकरे शिवसेनेशी सांगलीत प्रसंगी मैत्रीपूर्ण लढत करू, असा पवित्रा सांगली काँग्रेसने जाहीर केला. काँग्रेसचे विशाल पाटील यांनाच उमेदवारी मिळावी, या मागणीसाठी आमदार डॉ. विश्वजित कदम, आमदार विक्रम सावंत पृथ्वीराज पाटील, विशाल पाटील आदींनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, महासचिव खासदार के. सी. वेणुगोपाल, राष्ट्रीय आघाडी समितीचे अध्यक्ष मुकुल वासनिक, सलमान खुर्शीद या नेत्यांची भेट घेतली. सांगलीची जागा काँग्रेसलाच द्यावी, असे साकडे त्यांना घातले.

  या नेत्यांनी यापूर्वी मुंबईत काँग्रेसचे नेते नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण यांना भेटून सांगलीच्या जागेसाठी आग्रह धरला. या विषयावर महाविकास आघाडीच्या बैठकाही झाल्या. त्यात तोडगा निघेल, अशी आशा काँग्रेस नेत्यांना होती, मात्र ती फोल ठरली. त्यामुळे दिल्ली दरबारी धाव घेतली. दरम्यान, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ठाकरेंच्या शिवसेनेने यादीत चंद्रहार पाटील यांचे नाव जाहीर केल्यामुळे नाराजी व्यक्त केली.

  परंपरागत काँग्रेसची जागा

  काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष व काँग्रेस इच्छूक उमेदवार विशाल पाटील म्हणतात, काँग्रेस हा जबाबदार पक्ष असून, मित्रपक्षांसोबत चर्चा केल्याशिवाय जागा परस्पर जाहीर करत नाही. सांगलीची जागा ही काँग्रेसची परंपरागत जागा आहे. त्यामुळे मैत्रीपूर्ण लढत असो वा शत्रुत्वाची, मी लढायला तयार आहे. पक्षाने जर आदेश दिला तर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. आम्ही काँग्रेसशी एकनिष्ठ आहोत. आमदार विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली जो काही निर्णय होईल, त्याची अंमलबजावणी केली जाईल, असे पाटील यांनी सांगितले.

  काँग्रेस नेतृत्वाला भूमिका कळविली आहे.

  पक्ष नेतृत्व आमच्या भूमिकेचा आणि भावनेचा विचार करेल, अशी अपेक्षा आहे. अखेरच्या क्षणी मैत्रीपूर्ण लढत करायची झाली, तरी त्यासाठी तयारी आहे. पक्ष आदेश देईल, त्या पद्धतीने पुढे जाऊ. सांगलीच्या जागेवरील दावा कुठल्याही परिस्थितीत सोडणार नाही, वेळ आली तर शिवसेना ठाकरे गटाला आव्हान देण्याची तयारी आहे. आता सांगली जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते, विशाल पाटील आणि आम्ही सगळे मिळून पुढील निर्णय घेऊ. असं डॉ. विश्वजित कदम म्हणाले.