nana patole

भाजपकडून तोडफोडीचे राजकारण सुरु असले तरी भाजपचे अनेक नेते काँग्रेसच्या संपर्कात आहेत, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला. सत्तेच्या जोरावर त्यांना जेवढा खेळ खेळायचा आहे तेवढा त्यांना खेळू द्या.

    मुंबई : भाजपकडून तोडफोडीचे राजकारण सुरु असले तरी भाजपचे अनेक नेते काँग्रेसच्या संपर्कात आहेत, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला. सत्तेच्या जोरावर त्यांना जेवढा खेळ खेळायचा आहे तेवढा त्यांना खेळू द्या. आम्ही एकच हातोडा मारू मग त्यांना कळेल, असा इशाराही पटोले यांनी दिला.

    जागावाटपावरून महाविकास आघाडीत कसलेही मतभेद वा गोंधळ नसून गोंधळ हा महायुतीत आहे. त्यांच्यात काहीच ताळमेळ नाही. आघाडीतील सर्व मित्र पक्षांशी चर्चा सुरु असून बहुतांश जागा निश्चित झाल्या आहेत. लवकरच अंतिम निर्णय जाहीर केला जाईल. भाजपला सत्तेतून हद्दपार करणे हाच महाविकास आघाडीचा मुख्य उद्देश आहे, असेही पटोले यांनी स्पष्ट केले.

    तसेच ते म्हणाले, राज्यात महायुतीचे वातावरण कुठेच नाही, ते फक्त जाहिरातीतच दिसत आहे. जनतेच्या पैशाची उधळपट्टी करत वर्तमानपत्र, टीव्ही, सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी सुरु आहे. परंतु जनभावना मात्र वेगळ्या आहेत. निवडणुकीत महाराष्ट्रातील जनता भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही.

    बारामतीच्या जागेवरही शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच उमेदवार निवडून येणार आहे. भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष माध्यमातून वातावरण निर्मिती करत आहेत. मात्र, प्रत्यक्षात चित्र वेगळे आहे, असे पटोले म्हणाले,

    एका हातात ‘मशाल’, दुसऱ्या हातात ‘तुतारी’ अजित पवार यांनी बारामतीत बिर्याणीचा कार्यक्रम ठेवला होता. परंतु ते शरद पवारांविरोधात बोलायला लागले की लोक 5 मिनिटांत निघून गेले. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला तुतारी हे चिन्ह मिळाले आहे. एका हातात मशाल आणि दुसऱ्या हातात तुतारी हा भाजपच्या तानाशाहीला संदेश आहे. या तुतारीत अत्याचारी व्यवस्थेला संपवण्याची क्षमता आहे. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जन्म दिला. परंतु या अत्याचारी व्यवस्थेने त्यांचा पक्ष आणि घड्याळ चिन्हही चोरून घेतले, अशी टीका पटोले यांनी केली.