‘पालकमंत्री परत या…झेपत नसेल तर राजीनामा द्या’; काँग्रेसचे फडणवीस यांच्याविरोधात ‘डफडे बजाव’ आंदोलन

उपमुख्यमंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री असताना देखील फडणवीस यांनी गडचिरोली सारख्या मागास, दुर्गम जिल्ह्याचे पालकत्व स्वतःहून स्वीकारले. तरीही जिल्ह्यातील जनतेला विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

    गडचिरोली : उपमुख्यमंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री असताना देखील फडणवीस यांनी गडचिरोली सारख्या मागास, दुर्गम जिल्ह्याचे पालकत्व स्वतःहून स्वीकारले. तरीही जिल्ह्यातील जनतेला विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. पालकमंत्र्यांचा मात्र पत्ता नाही. यामुळे संतप्त जिल्हा काँग्रेसने गुरुवारी शहराच्या मुख्य चौकात ‘डफडे बजाव आंदोलन करून ‘फडणवीस परत या’ अशी साद घातली.

    जिल्ह्यातील नागरिक विविध समस्यांनी त्रस्त आहेत. पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ऊर्जा खाते असताना देखील शेतीला नियमित वीज पुरवठा नाही. रानटी हत्ती आणि वाघाच्या धुमाकुळाने शेतकरी त्रस्त आहेत. प्रशासकीय अधिकारी जिल्ह्याचे मालक असल्याप्रमाणे वागत आहेत. याकडे पालकमंत्री फडणवीस यांचे दुर्लक्ष होत असून मागील अनेक महिन्यांपासून त्यांनी जिल्ह्यात दौरा केलेला नाही.

    मागील आठवड्यात गडचिरोली जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी पत्र लिहून पालकमंत्र्यांनी किमान दिवाळीच्या फराळकरिता तरी यावे, असे निमंत्रण दिले होते. मात्र, पालकमंत्र्यांच्या दौऱ्याची अजूनही काही चाहूल न लागल्याने जिल्हा काँग्रेसच्या वतीने ‘पालकमंत्री फडणवीस परत या, जबाबदारी झेपत नसेल तर राजीनामा द्या’ अशी घोषणाबाजी करत जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या नेतृत्वात इंदिरा गांधी चौकात डफडे बजाव आंदोलन केले.