भाजपवासी अशोक चव्हाणांसाठी नाना पटोलेंची खास पोस्ट: म्हणाले, निर्लज्जपणाची देखील सीमा

अशोक चव्हाण यांच्या भाजपप्रवेशामुळे राज्याच्या राजकारणामध्ये समीकरणे बदलली आहे. या पक्षप्रवेशानंतर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खास पोस्ट लिहिली आहे. यामध्ये त्यांनी भाजपची पुण्याच्या जमिन घोटाळ्याची जुनी पोस्ट शेअर करत जोरदार टोला लगावला आहे.

    मुंबई : अनेक वर्षे कॉंग्रेससोबत (Congress) संसार केलेल्या अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपची कास धरली. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भाजपने (Ashok Chavan In BJP) गेल्या अनेक वर्षांपासून घोटाळ्यांचे आरोपसत्र सुरु ठेवले आहे. आदर्श घोटाळ्यावरुन (Adarsh Scam) अशोक चव्हाण यांच्यावर भाजपने (BJP) निशाणा साधल्यानंतर आता त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. अशोक चव्हाण यांच्या भाजपप्रवेशामुळे राज्याच्या राजकारणामध्ये समीकरणे बदलली आहे. या पक्षप्रवेशानंतर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी खास पोस्ट लिहिली आहे. यामध्ये त्यांनी भाजपची पुण्याच्या जमिन घोटाळ्याची जुनी पोस्ट शेअर करत जोरदार टोला लगावला आहे.

    माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. यावर आता नाना पटोले यांनी खास पोस्ट शेअर करत भाजपचा समाचार घेतला आहे. ट्वीटर भाजपची जुनी पोस्ट शेअर करत नाना पटोले यांनी लिहिले आहे की, भाजपाची स्मरणशक्ती कमजोर आहे किंवा ते जनतेला मुर्ख समजतात. भाजपाचे आरोप – माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे तथाकथित आदर्श घोटाळ्यातील आरोपी आहेत. कृती – अशोक चव्हाण यांच्यामागे ईडी, सीबीआय यांचा ससेमीरा लावला. परिणाम – अखेर या जाचाला कंटाळून अशोक चव्हाण भाजपात दाखल. आता प्रश्न असा आहे की, कालपर्यंत जे तुम्हाला भ्रष्ट वाटत होते त्यांनी नेमकं असं काय पुण्य केलं ते अचानक तुम्हाला पुजनीय वाटू लागले ?  निर्लज्जपणाची देखील काहीतरी एक सीमा असते. अशा शब्दांत नाना पटोले यांनी भाजप व अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधला आहे.

    काय आहे भाजपच्या पोस्टमध्ये ?

    बीजेपी महाराष्ट्रच्या ऑफिशियल ट्वीटर अकाऊंटवरुन अशोक चव्हाण यांच्याविरोधात 24 मार्च 2019 रोजी ही पोस्ट करण्यात आलेली आहे. विसरला नाही महाराष्ट्र अशा हेडलाईनखाली अशोक चव्हाणांवर भाजपने गंभीर आरोप केले. पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘अशोक चव्हाण महसूल मंत्री असताना पुण्यातील मुक्याच्या ठिकाणची 102 एकर जागा एका खाजगी बिल्डरच्या घशात केवळ 4 हजार 058 रुपयांत घातली होती. या जागेची मूळ किंमत 2500 कोटी रुपये होती,’ असा आरोप भाजपने केला आहे. त्याचबरोबर कॅप्शनमध्ये ‘विसरला नाही महाराष्ट्र’ व ‘आघाडी बिघाडी’ असे हॅशटॅग दिले आहेत.