विजय वडेट्टीवारांची सरकारवर टीका म्हणाले, घाईघाईमध्ये आरक्षण देताना ओबीसी…

आरक्षणावरुन आता विजय वडेट्टीवार यांनी देखील राज्य सरकारला टोला लगावला असून सरकार काय करतंय?असा सवाल उपस्थित केला आहे.

    अमरावती : विधानसभेचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी राज्य सरकार (State Govt) आणि केंद्र सरकारवर  निशाणा साधला. राज्यामध्ये पुन्हा एकदा मुंबईमध्ये (Mumbai) मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मुद्द्यावरुन आंदोलन होणार आहे. आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मुंबईला जाण्याची भूमिका ठाम असल्याचे सांगितले आहे. तसेच त्यांनी राज्य सरकारच्या कामकाजावर ताशेरे देखील ओढले आहेत. आरक्षणावरुन आता विजय वडेट्टीवार यांनी देखील राज्य सरकारला टोला लगावला असून सरकार काय करतंय?असा सवाल उपस्थित केला आहे.

    मराठा आरक्षणाबद्दल बोलताना विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ओबीसीवर अन्याय होऊ नये अशी मागणी केली. वडेट्टीवार म्हणाले, ओबीसीच नुकसान करून मराठा समाजाला आरक्षण देऊ नका. घाईघाईने कोणताही निर्णय घेता कामा नये. घाईघाईने घेतलेल्या निर्णयामुळे कोणत्याही समाजाचे नुकसान होऊ नये. मराठा समाजाला आरक्षण देतांना ते टिकावू असलं पाहिजे. घाईघाईमध्ये देताना ओबीसीच नुकसान होता कामे नये. आरक्षणावर सरकार काय करतंय? सरकारने हे धंदे बंद करावे. असा घणाघात विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर केला.

    तसेच राम मंदिर उद्घाटनावरुन देखील वडेट्टीवारांनी केंद्र सरकारला घेरले. अयोध्येमध्ये येत्या २२ तारखेला होणाऱ्या राम मंदिर उद्घाटनाला चार शंकराचार्यांनी विरोध केला असून बांधकामाधीन असलेल्या मंदिरामध्ये प्राण प्रतिष्ठा करण्यावर नाराजी व्यक्त केली. याबद्दल बोलताना वडेट्टीवार म्हणाले, अयोध्या राम मंदिराला चार शंकराचार्यांनी विरोध केला आहे. अपुऱ्या मंदिरात प्राणप्रतिष्ठा कशी होऊ शकते? तर सनातन धर्माला हे लागू होत का? तरी देखील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजप हा इव्हेंट करत आहे. राजकीय फायदा घेण्यासाठी भाजपचा डाव आहे असा गंभीर आरोप विजय वडेट्टीवार यांनी मोदी सरकारवर केला आहे.