काँग्रेस सांगलीत लढणारच, नेते ठाम; महाविकास आघाडीत काँग्रेस विरुद्ध सेना वाढला ताण

महाविकास आघाडीत सांगलीची जागा ठाकरेंच्या शिवसेनेने सोडली नाही, तरी काँग्रेस सांगली लढणारच, असा महत्त्वाचा निर्णय जिल्ह्यातील नेत्यांनी आज प्रदेश आणि केंद्रीय नेत्यांना कळवला.

  सांगली / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : महाविकास आघाडीत सांगलीची जागा ठाकरेंच्या शिवसेनेने सोडली नाही, तरी काँग्रेस सांगली लढणारच, असा महत्त्वाचा निर्णय जिल्ह्यातील नेत्यांनी आज प्रदेश आणि केंद्रीय नेत्यांना कळवला. आमदार विश्वजित कदम, विक्रम सावंत, प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील यांनी मुंबईत एकत्र येत काँग्रेस एकजुटीचा नारा दिला.

  सांगलीत काँग्रेसला माघार घेणे परवडणारे नाही. लोकसभाच नव्हे, तर विधानसभा निवडणुकीवरही त्याचा विपरित परिणाम होईल. त्यामुळे काँग्रेसने शिवसेनेला अखेरची विनंती करावी, अन्यथा मैत्रीपूर्ण लढतीला आम्ही तयार आहोत, असा स्पष्ट संदेश दिला. त्यामुळे महाविकास आघाडीत काँग्रेस विरुद्ध सेना असा ताण वाढला आहे.

  दरम्यान, सायंकाळी महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची दोन्ही बाजूंनी आम्हाला मिळाली असल्याची बातमी माध्यमांवर सुरू झाली. त्यात शिवसेनेला २२ जागा दाखवण्यात आल्या आणि सांगली मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेल्याचे सांगण्यात आले. त्याबद्दल काँग्रेस नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. काँग्रेस महासचिव के. सी. वेणुगोपाल यांची विश्वजित यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने भेट घेतली. जिल्ह्यात काँग्रेस १७ वेळा लोकसभा जिंकली आहे. २०१४ ला मोदी लाटेत पराभव झाला.

  २०१९ ला ही जागा सोडावी लागली. सांगली काँग्रेस मजबूत आहे आणि यावेळी परिस्थिती विजयासाठी अनुकूल आहे. केवळ कुणाच्यातरी हट्टासाठी सांगली पणाला लावू नका, अशी आग्रही विनंती त्यांनी केली. प्रदेश काँग्रेसने आम्हाला मान्यता द्यावी, आम्ही मैत्रिपूर्ण लढतीला तयार आहोत, असेही काँग्रेस नेत्यांनी स्पष्ट सांगितले.

  खर्गेंची भेट, पवारांची भेट

  काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची रविवारी रात्री उशिरा भेट घेऊन सांगलीच्या जागेबाबत तोडगा काढण्याची विनंती केली. तर सोमवारी सकाळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची देखील भेट घेतली.

  शिवसेना ठाकरे गटाने ठरवली सभा

  डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी प्रवेश केल्यानंतर आता लोकसभेच्या जागेवर दावा करीत, २१ मार्च रोजी मिरज येथे उद्धव ठाकरे यांच्या सभेची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे आता महविकास आघाडीचा अधिकृत निर्णय ठरण्यापूर्वीच ठाकरे चंद्रहार पाटील यांच्या प्रचाराला येणार का? याबाबत चर्चा सुरू आहे.

  सांगलीची जागा ही काँग्रेसची आणि काँग्रेसच लढणार

  ‘उद्धव ठाकरे साहेबांनी सांगलीच्या जागेची कोणतीही घोषणा केलेली नाही. हा कोणत्याही व्यक्तिगत किंवा एका पक्षाचा मुद्दा नाही. हा निर्णय महाविकास आघाडीचा असेल. चंद्रहार पाटील आमचे मित्र आहेत. चांगले पैलवान आहेत. मात्र, सांगलीची जागा ही काँग्रेसची आहे आणि काँग्रेसच लढेल. त्यासाठी जिल्ह्यातील नेते आग्रही. प्रयत्नशील आहेत’.

  – विश्वजीत कदम, आमदार.