इसिसच्या दहशतवाद्यांशी कनेक्शन कोल्हापूर जिल्ह्यातील तिसरी घटना

राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेच्या एका तपास पथकाने हुपरी, रेंदाळ परिसरात छापेमारी करून इसिस या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून मुस्लिम समाजातील दोघा सख्या भावांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. रविवारी पहाटे झालेल्या या कारवाईचे वृत्त बाहेर पडताच कोल्हापूरसह दक्षिण महाराष्ट्रात एकच खळबळ उडालेली आहे.

    कोल्हापूर : राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेच्या एका तपास पथकाने हुपरी, रेंदाळ परिसरात छापेमारी करून इसिस या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून मुस्लिम समाजातील दोघा सख्या भावांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. रविवारी पहाटे झालेल्या या कारवाईचे वृत्त बाहेर पडताच कोल्हापूरसह दक्षिण महाराष्ट्रात एकच खळबळ उडालेली आहे. यापूर्वीही दहशतवादी संघटनांशी थेट संबंध आढळून आल्याच्या दोन घटना कोल्हापूरशी संबंधित आहेत.

    इसिस ही दहशतवादी संघटना भारतामध्ये दहशतवादी कारवाया घडवण्याच्या तयारीत आहे. अशी माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेला समजल्यानंतर शनिवार आणि रविवार दरम्यानच्या मध्यरात्री राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या विविध पथकांनी देशातील अनेक राज्यामधील १३ जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी धाडी टाकल्या त्यामध्ये महाराष्ट्रातील नांदेड आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांचा समावेश आहे.

    चांदीच्या व्यापाऱ्यांना घेतले ताब्यात
    राष्ट्रीय तपास यंत्रणेचे एक पथक शनिवारी कोल्हापुरात दाखल झाले. या पथकाने हातकणंगले तालुक्यातील हुपरी, रेंदाळ परिसरातील अंबाबाई नगरामध्ये राहणाऱ्या इर्शाद नामक चांदी व्यापाऱ्याच्या निवासस्थानावर रविवारी पहाटे छापा टाकला.

    इर्शाद आणि त्याचा भाऊ या दोघांच्याकडे राष्ट्रीय तपास यंत्रणेचे अधिकारी चौकशी करत असतानाच काही तास त्यांच्या घराची झडती ही घेण्यात येत होती. त्यानंतर या पथकाने या दोघा सख्या भावांना संशयावरून चौकशीसाठी ताब्यात घेतले.

    या दोघांच्याकडे कोल्हापूर शहरातीलच एका गोपनीय ठिकाणी चौकशी सुरू आहे. या दोन भावांचा चांदीचे दागिने घडविण्याचा व्यवसाय आहे. हे बंधू पूर्वी इचलकरंजी येथे राहत होते. पण गेल्या काही वर्षांपासून ते हुपरी, रेंदाळ परिसरात राहतात आणि राहण्याच्या ठिकाणीच त्यांचा चांदीचे दागिने घडविण्याचा व्यवसाय आहे.

     लबैका फाउंडेशन संघटनेशी संबंध
    मुंबई येथील मुस्लिम समाजाच्या वतीने चालविण्यात येत असलेल्या लबैका फाउंडेशन या सामाजिक संघटनेशी इरशाद आणि त्याचा भाऊ यांचे संबंध आहेत. या सामाजिक संघटनेला आर्थिक सहाय्य करण्यासाठी हे दोघे भाऊ कोल्हापुरातून निधी संकलन करत असतात असे समजते.

     एनआयएच्या कारवाईने परिसरात खळबळ
    या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून इसिस या दहशतवादी संघटनेला आर्थिक रसद पुरवली जात असल्याच्या संशयावरून राष्ट्रीय तपास यंत्रणेने तपास सुरू केला होता. त्यातच या संघटनेकडून काही दहशतवादी कारवाया घडवून आणल्या जाणार असल्याच्या संशयावरून एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून एकाच वेळी तेरा ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत.
    राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या एका खास पथकाने कोल्हापुरात येऊन शनिवार, रविवार दरम्यानच्या मध्यरात्री मोठी कारवाई केली असल्याचे वृत्त आज रविवारी दिवसभर वाऱ्यासारखे कोल्हापुरात पसरले आणि एकच खळबळ उडाली. ताब्यात घेतलेल्या दोघा सख्या भावांच्याकडून काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागलेले आहेत का? हे कळायला मार्ग नाही कारण राष्ट्रीय तपास यंत्रणांकडून स्थानिक पोलिसांना याप्रकरणी विश्वासात घेतलेले नाही त्यामुळे स्थानिक पोलिसांनीही याबद्दल आम्हाला काहीच माहिती नाही असा खुलासा केलेला आहे.

    याआधी देसाई नावाच्या एजंटला अटक  
    वीस वर्षांपूर्वी हातकणंगले तालुक्यातील एका गावामध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या एका पथकाने स्थानिक पोलिसांची मदत घेऊन देसाई नावाच्या एका आयएसआय एजंटाला अटक केली होती. विशेष म्हणजे या एजंटाने एका स्थानिक मुस्लिम युतीशी लग्न करून गावांमध्ये संसारही थाटला होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक धैर्यशील पवार यांनी देसाई या आयएसआय एजंटाला पकडण्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेला मदत केली होती, त्यावेळी कोल्हापूर जिल्ह्यात मोठी खळबळ उडालेली होती.

    कोल्हापूरातील तिसरा प्रकार
    आठ ते दहा वर्षांपूर्वी कोल्हापुरातीलच एक मुस्लिम युवक काश्मीर खोऱ्यात सीमा सुरक्षा दलाच्या जवानांच्या बरोबर झालेल्या चकमकीत ठार झाला होता. ताराबाई पार्क परिसरात एका आर्थिक दृष्ट्या संपन्न असलेल्या कुटुंबात जन्म घेतलेला हा तरुण राजस्थान येथील मदरशामध्ये अध्ययन करत होता. त्यानंतर त्याचे अल कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंध आले त्यानंतर तो दहशतवादी बनला. सीमा सुरक्षा दलाच्या जवानांच्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात कोल्हापूरचा हा मुस्लिम युवक आघाडीवर होता. सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी केलेल्या गोळीबारात कोल्हापूरचा हा चांगल्या कुटुंबातील युवक दहशतवादी म्हणून मारला गेला. तेव्हाही कोल्हापुरात प्रचंड खळबळ उडालेली होती. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात खळबळ उडवून देणाऱ्या यापूर्वीच्या दोन घटना नंतर  इसिस या दहशतवादी संघटनेशी कनेक्शन असल्याचा तिसरा प्रकार रविवारी उघडकीस आलेला आहे.