बांधकाम साहित्य चोरणारी टोळी जेरबंद; एक लाख 35 हजाराचा मुद्देमाल जप्त

माजी नगरसेवक रवींद्र ढोणे यांच्या बांधकाम साईट वरील लोखंडी साहित्य चोरून येणाऱ्या तिघांना शाहूपुरी पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून एक लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शाहूपुरी पोलिसांनी ही कामगिरी केली असून या कामगिरीचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी कौतुक केले आहे.

    सातारा : माजी नगरसेवक रवींद्र ढोणे यांच्या बांधकाम साईट वरील लोखंडी साहित्य चोरून येणाऱ्या तिघांना शाहूपुरी पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून एक लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शाहूपुरी पोलिसांनी ही कामगिरी केली असून या कामगिरीचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी कौतुक केले आहे.

    बजरंग यशवंत काळे (वय ३३) राहणार काळे वस्ती कोंडवे, सोमवती विजय घाडगे (वय ३०) राहणार सैदापूर जिल्हा सातारा, पुनम मुकेश जाधव (वय २५) राहणार गोसावी वस्ती सैदापूर अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत.

    मंगळवार पेठ येथे बांधकाम साईट सुरू

    याबाबत अधिक माहिती अशी की, माजी नगरसेवक रविंद्र ढोणे यांची मंगळवार पेठ येथे बांधकाम साईट सुरू आहे. या साइटवरून (दि.२०) मे रोजी अज्ञात महिलांनी लोखंडी साहित्य रिक्षातून चोरून नेल्याची फिर्याद विजय रमेश देशमुख यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली होती. यासंदर्भात पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी शाहूपुरी पोलीस टीमला तात्काळ गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या. पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेने तात्काळ तपास सुरू केला. घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज या कामी तपासण्यात आले. २५ मे रोजी पोलीस हेड कॉन्स्टेबल हसन तडवी हे रात्रपाळीसाठी असताना पहाटेच्या सुमारास त्यांना रिक्षामध्ये दोन महिला संशयित रित्या फिरताना आढळून आल्या. गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने त्या महिलांची कौशल्यपूर्ण चौकशी केली असता त्यांनी ढोणे यांच्या बांधकाम साइटवर साहित्य चोरी केल्याचे कबूल केले.

    आरोपींना एक दिवसाची पोलीस कोठडी

    यामध्ये लोखंडी रिंगा, लोखंडी बार तसेच साहित्य नेण्यासाठी वापरण्यात आलेले रिक्षा व मोबाईल असा एक लाख ३५००० चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. रिक्षाचालक व दोन महिला या रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोपींना एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली असून हेड कॉन्स्टेबल हसन तडवी तपास करत आहेत. या कारवाईत हसन तडवी, लैलेश फडतरे, तुषार डमकले, अमित माने, स्वप्निल कुंभार, ओंकार यादव, सचिन पवार, शशिकांत नलावडे यांनी भाग घेतला होता.