पती-पत्नीचा दरोड्याचा बनाव उघडकीस! शेतजमिनीच्या मोबदल्यातील वाटणी बहिणीला द्यावी लागू नये म्हणून लढविली शक्कल

कॅनॉलमध्ये गेलेल्या शेतजमिनीच्या मोबदल्यात मिळालेल्या लाखो रुपयातील वाटणी बहिणीला द्यावी लागू नये, या उद्देशाने पती-पत्नीने घरात दरोडा पडल्याचा केला बनाव केला. दुपारी अचानक सात अनोळखी इसम घरी आले. त्यांनी घरातील दोन महिलांना मारहाण करून जबरदस्तीने घरातील अंदाजे सहा लाख रुपये रोख व १५ तोळे सोने घेऊन गेल्याची खबर कुरुंदवाड पोलीस ठाण्यास मिळतात पोलिसांची धावपळ झाली

  कुरुंदवाड : कॅनॉलमध्ये गेलेल्या शेतजमिनीच्या मोबदल्यात मिळालेल्या लाखो रुपयातील वाटणी बहिणीला द्यावी लागू नये, या उद्देशाने पती-पत्नीने घरात दरोडा पडल्याचा केला बनाव केला. दुपारी अचानक सात अनोळखी इसम घरी आले. त्यांनी घरातील दोन महिलांना मारहाण करून जबरदस्तीने घरातील अंदाजे सहा लाख रुपये रोख व १५ तोळे सोने घेऊन गेल्याची खबर कुरुंदवाड पोलीस ठाण्यास मिळतात पोलिसांची धावपळ झाली, परंतु पाेलिसांनी कसून तपास करीत बनावट दरोड्याचा पर्दाफाश उघडकीस आणला.
  सर्व रक्कम व दागिने सुरक्षित असल्याचे निष्पन्न झाले.

  शिवनाकवाडी (ता. शिरोळ) येथे गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास रत्‍नाबाई अशोक खोत आणि तिची सवत हिराबाई अशोक खोत या दोघी घरी असताना अचानक सात अनोळखी व्यक्ती घरी आले. त्या सर्वांनी या दोघींना जबर मारहाण केली अन जबरदस्तीने त्यांच्याकडून घरात असलेले सहा लाख रुपये रोख रक्कम आणि १४ तोळे सोने घेऊन पळून गेले. झालेली घटना रत्‍नाबाई खोत यांनी पती अशोक खोत यांना फोनवरून सांगितली. त्यांनी गावातील पोलीस पाटील खोत यांना झालेला प्रकार सांगितला. त्यांनी कुरुंदवाड पोलीसात ‌खबर दिली आणि पोलिसांची तपासाची चक्रे गतिमान झाली.

  कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे पोलीस पथक, गुन्हे अन्वेषण शाखा, ठसे तज्ज्ञ, श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले. दिवसाढवळ्या दुपारी अनोळखी सात व्यक्ती दरोडा टाकतात आणि लाखो रुपये व सोने घेऊन जातात ही घटना पोलिसांना आव्हानात्मक होती. या दृष्टीने सर्व पोलीस यंत्रणा गतिमान झाल्या. घडलेल्या घटनेवर लक्ष केंद्रित केले.

  असा रचला बनाव
  पोलिसांच्या तपासातून घटनेचा उलगडा झाला. अशोक खोत यांच्यासह तीन चुलत भाऊ यांची शेत जमीन कॅनॉलमध्ये गेली होती. त्या शेतजमिनीची नुकसान भरपाई म्हणून अंदाजे दीड कोटी रुपये तिघा भावांना मिळाले होते. यातील काही रक्कम दाम दुपटीने बँकेत ठेवली आहे, तर काही रकमेचे सोने आणि काही रक्कम घरात ठेवली होती. या सर्व  रकमेतील  वाटणी बहिणीला द्यावी लागू नयेम्हणून पती-पत्नीने दरोड्याचा बनाव केला. स्वतःच घरातील साहित्य विस्कटले. रोख रक्कम व सोने घरातील माळ्यावर लपून ठेवले आणि पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी खोटी माहिती रचली.

  सुटकेचा नि:श्वास सोडला
  कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक विराज फडणीस यांच्या नजरेतून हा बनाव सुटू शकला नाही. संबंधितांना पोलिसी खाक्या दाखविताच खरी माहिती बाहेर आली आणि पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. या तपासाबाबत पोलिसांचे कौतुक होत आहे.