कंत्राटदारांची १५० कोटींची बिले रखडली, मनपा आर्थिक अडचणीत

सोबतच पालिका आमदार-खासदारांच्या निधीतूनही वॉर्डातर्गत विकासकामे केली जात आहे. असे असतानाही पालिकेच्या माध्यमातून केल्या जाणार्‍या विकासकामांची तब्बल १५० कोटी रूपये एवढी कंत्राटदारांनी बिले रखडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

    छत्रपती संभाजीनगर : महापालिका प्रशासन पुन्हा एकदा आर्थिक अडचणीत सापडले आहेत. कंत्राटदारांची देणी तब्बल १५० कोटींवर पोहचली आहे. दुसरीकडे पालिकेतून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची पेन्शन आणि ग्र्रॅज्युटीची रक्कम देखील रखडली आहे. ही रक्कम ३६ कोटी एवढी आहे.

    २०१६-१८ या कार्यकाळात विविध विकासकामांची तब्बल २८६ कोटी रूपयांची कंत्राटदारांची बिले रखडली होती. त्यामुळे कंत्राटदारांवर बिले काढण्यासाठी आंदोलनाची वेळ आली होती. वारंवार आंदोलने करून, निवेदने देऊनही प्रशासन दखल घेत नसल्याने तब्बल २२ दिवस कंत्राटदारांनी साखळी उपोषण केले. त्यानंतर प्रशासक म्हणून आलेले आस्तिककुमार पांडेय यांनी योग्य नियोजन करत दीड वर्षांतच कंत्राटदारांची सर्व देणी चुकती केली. मागील पाच वर्षात पालिकेला रस्त्यांसह विविध विकासकामांसाठी भरघोस निधी मिळाला. यामुळे शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था सुधारून रस्ते गुळगुळीत झाले आहे. सौंदर्यीकरण व सुशोभीकरणामुळे शहराचे रूपडे पालटले आहे.

    सोबतच पालिका आमदार-खासदारांच्या निधीतूनही वॉर्डातर्गत विकासकामे केली जात आहे. असे असतानाही पालिकेच्या माध्यमातून केल्या जाणार्‍या विकासकामांची तब्बल १५० कोटी रूपये एवढी कंत्राटदारांनी बिले रखडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यासंबंधीची माहिती मुख्य लेखाधिकारी संतोष वाहुळे यांनी पत्रपरिषदेत पालिका प्रशासक जी. श्रीकांत यांच्यासमक्ष दिली. त्यांनी सांगितले की, मागील दोन-तीन वर्षांत पालिकेच्या माध्यमातून केलेल्या विकासकामांची देणी बाकी आहेत. ही रक्कम सध्या १५० कोटींवर पोहचली आहे. तसेच कर्मचार्‍यांचे पेन्शन व ग्रॅज्युटीची रक्कम देखील बाकी आहे. पेन्शन व ग्रॅज्युटीचे ३६ कोटी रूपये देणे बाकी आहे. याप्रमाणे एकूण १८६ कोटी रूपयांची देणी सध्या बाकी आहेत. यावर प्रशासक जी. श्रीकांत यांनी आगामी काळात कर वसुलीवर भर दिला जाणार असल्याचे स्पष्ट केले.

    विकासकामे रखडली, माजी नगरसेवक नाराज – गतवर्षी प्रत्येक वॉर्डात ६० ते ६५ लाखांची विकासकामे प्रस्तावित करण्यात आली. यातील काही कामे पूर्ण झाली असून काही प्रगतीपथावर आहेत. तर बहुतांश कामे अद्याप निविदा प्रक्रियेत देखील आलेली नाहीत. त्यामुळे माजी नगरसेवकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. सध्यस्थितीत १८६ कोटी रूपयांची देणी रखडली असून ती अदा करण्यासाठी पालिकेला कर वसुलीचा वेग वाढवावा लागणार आहे. पालिकेने मागील दोन महिन्यांत २५ कोटी रूपये अदा करून रॅम्कीचे प्रकरण निकाली काढले. यामुळे मोठी आर्थिक तूट निर्माण झाली आहे.