नालासोपाऱ्यातील वादग्रस्त शादी डाॅट काॅम हाॅल पालिकेने केला जमीनदोस्त

    रविंद्र माने, वसई :  कर्मचा-याचा मृत्यू दडवल्याप्रकरणी सिग दाम्पत्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर नालासोपारातील वादग्रस्त शादी डाॅट काॅम हाॅल पालिकने जमीनदोस्त केला आहे.

    पुर्वेकडील आंबावाडी येथे असलेल्या शादी डाॅट काॅम हा हाॅल शोभना सिंग आणि प्रदीप सिंग यांच्या मालकीचा आहे.या हाॅलमध्ये अनेक पक्षांचे जाहीर कार्यक्रम सातत्याने झाले होते.निवडणूक काळात तर हा हाॅल प्रचाराचे केंद्र बिंदु ठरला होता.अशा या हाॅलमध्ये काम करणा-या सत्येंद्र मिश्रा (४२) या कर्मचा-याचा वसई-गोखिवरे येथे गणपती मंडपाचे काम करताना शाॅक लागून मृत्यू झाला होता.तशी माहिती मंडपाचे ठेकेदार प्रदीप सिंग याने पोलीसांना दिली होती. त्यानुसार पंचनामा करुन आचोळे पोलीसांनी मृतदेह मिश्रा च्या गावी अंत्यसंस्कारासाठी पाठवला होता.मात्र काही दिवसांनी मिश्रा याचा मृत्यू गणेशोत्सव मंडपात नाही तर नालासोपारा पूर्वेच्या शादी डॉट कॉम या सभागृहात झाल्याची गोपनीय माहिती तुळींज पोलिसांना मिळाली.त्या दृष्टीने तपास केल्यावर गोखिवरे त ज्या ठिकाणी घटना घडली अशी माहिती सिंग ने दिली तिथे असा कुठलाही प्रकार घडला नसल्याचे स्पष्ट झाले.

    त्यामुळे पोलिसांनी शादी डाॅट काॅम परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता मिश्रा याचा मृतदेह सभागृहातून बाहेर नेला असल्याचे दिसून आले. मालक प्रदीप सिंग याने हा प्रकार दडपल्याचे स्पष्ट झाल्यानंतर याप्रकरणी तुळींज पोलिसांनी सभागृहाच्या मालक शोभना सिंग आणि प्रदीप सिंग यांच्या विरोधात निष्काळजीपणे मृत्यूस कारणीभूत ठरणे कलम ३०४ (अ) आणि पुरावा नष्ट केल्याप्रकरणी कलम २०१, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आम्ही महावितरण व सार्वजनिक बांधकाम खात्याला पाचारण करून पंचनामा केला व त्या कर्मचाऱ्याचा मृत्यू सभागृहातच झाल्याचे स्पष्ट झाले अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन म्हात्रे यांनी दिली.

    विज पुरवठा ही चोरी चा या हाॅलला महावितरणने नियमबाह्य आणि धोकादायक पद्धतीने चोरटा विज पुरवठा दिल्याचे उघड झाले आहे. एका झाडावर फळी मारून हे थ्री फेस कनेक्शन देण्यात आल्याचे आढळून आले होते. तशी माहिती देवून, या चोरट्या आणि असुरक्षीत विज पुरवठ्यामुळे भविष्यात जीवितहानी होण्याची भिती व्यक्त करुन प्रहार जनशक्तीचे जिल्हाध्यक्ष हितेश जाधव यांनी, पुरवठा खंडीत करण्याची मागणी केली होती.त्यासाठी आंदोलनाचा इशाराही दिला होता.मात्र,त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे सत्येंद्र मिश्रा यांचा नाहक बळी गेला आहे.त्यामुळे या प्रकरणी चौकशी करुन चोरटा विज पुरवठा देणा-या महापािलकेच्या कर्मचा-यावरही गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी जाधव यांनी केली आहे.

    शादी डाॅट काॅम चे जमीनीवरही अतिक्रमण नालासोपारातील ग्रामस्थ प्रकाश नाईक यांच्या जागेवर अतिक्रमण करुन शादी डाॅट काॅम हाॅल उभारण्यात आला होता. या प्रकरणी नाईक यांनी महापालिकेकडे तक्रार केली होती. त्यानुसार मंगळवारी हा हाॅल पालिकेने जमीनदोस्त केला.