‘आमच्या मुलीबाळींना प्रेमाच्या जाळ्यात ओढत असतील तर यांची जमातच नष्ट करून टाकू’, लव्ह जिहादवरून शिंदे गटाच्या आमदाराचे वादग्रस्त विधान

  कल्याण :  लव्ह जिहादवरून कल्याण पश्चिम मतदारसंघातील शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर हे चांगलेच आक्रमक झाल्याचे एका व्हिडीओमधून दिसून आले. दरम्यान, हा व्हिडीओ  १ ऑगस्ट रोजी आग्री सेनेच्या 37 व्या वर्धापन दिनानिमित्त एका कार्यक्रमात ते आपल्या आग्री बांधवांना उद्देशून बोलत होते.

  लव्ह जिहाद प्रकरणावरून वादग्रस्त विधान

  यांनी कथित लव्ह जिहाद प्रकरणावरून वादग्रस्त विधान केले आहे. कुठल्यातरी एक-दोन मुलींनी लव्ह जिहादला बळी पडून आपला धर्म बदलला आहे. त्या त्यांच्याबरोबर (मुस्लीम तरुणांबरोबर) पळूनही गेल्या आहेत. त्यामुळे त्याची जमातच नष्ट करून टाकू, अशा अर्थाचं विधान विश्वनाथ भोईर यांनी केले आहे. याबाबतचा एक व्हिडीओ राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.

  भाषणाची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल

  जितेंद्र आव्हाडांनी शेअर केलेला व्हिडीओ १ ऑगस्ट रोजीचा असून आगरी सेनेच्या ३७ व्या वर्धापनदिन सोहळ्याच्या कार्यक्रमातील आहे. या कार्यक्रमातच शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी हे वादग्रस्त विधान केले आहे. लव्ह जिहाद हा आगरी-कोळी समजाच्या दाराजवळ आला आहे. हा मुद्दा मी सभागृहात मांडणार होतो. सभागृहात मी अबू आझमींसह इतर चार-पाच लोकांना थेट सांगणार होतो की, यांची जमातच नष्ट करून टाकू, असे विधान भोईर यांनी केलं. त्यांच्या भाषणाची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

  सभागृहात बोलण्याचा माझा विषयही हाच होता

  यावेळी विश्वनाथ भोईर म्हणाले, लव्ह जिहाद हा आगरी-कोळी समाजाच्या दाराजवळ आला आहे. एकदम दाराजवळ आलाय. दाराजवळ नाही तर घरात घुसलाय. कुठल्यातरी एक-दोन मुलींनी लव्ह जिहादला बळी पडून आपला धर्मसुद्धा बदललाय. त्या त्यांच्याबरोबर पळूनही गेल्या आहेत. इथे कुणी फेसबूक किंवा व्हॉट्सअॅप वापरत असाल तर त्यांनी ते ऐकले असेल. सभागृहात बोलण्याचा माझा विषयही तोच होता. सभागृहात अबू आझमी आणि अजून चार-पाच लोक आहेत. त्यांना सरळ सांगणार होतो. यांची जमातच नष्ट करून टाकू.

  दंगल घडली तर सगळ्यात आधी गाववाले उभे राहायचे

  विश्वनाथ भोईर पुढे म्हणाले की, भिवंडी आणि कल्याणमध्ये दंगल घडली तर सगळ्यात आधी गाववाले उभे राहायचे. आगरी कोळी उभा राहायचा. तेव्हा आपण यांची हवा टाईट करायचो. भिवंडी आणि कल्याणची दंगलही आगरी-कोळी सांभाळायचा. आता जर हे आमच्याच मुलींना जाळ्यात अडकवत असतील तर त्यांना संपवून टाकू, अशा भाषेत मी बोलणार होतो. मग मला सभागृहातून बाहेर काढलं असतं तरी चाललं असतं. मला पक्षातून काढून टाकलं असतं तरी चाललं असतं. यासाठी माझी तयारी होती.