यांच्या बापाने यांना असा इतिहास शिकवला का? शिवरायांवरील वक्तव्यानंतर आव्हाड भडकले

राज्यपाल कोश्यारींचा समाचार घेताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, मला वाटते शिवरायांबद्दल वक्तव्य करून जाणून बुजून महाराष्ट्राच्या भावना दुखवण्याचे काम केले जात आहे. राज्यपालांना वरच्यांचा (दिल्ली) आशिर्वाद आहे.

    मुंबई – “छत्रपती शिवाजी महाराज यांनी औरंगजेबाची पाच वेळा माफी मागितली” असे भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी म्हणाले. यांच्या बापाने यांना असा इतिहास शिकवला आहे का?असा जळजळीत सवाल राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाजपला विचारला. ते एका वृत्तवाहिनीशी आज बोलत होते.

    आव्हाड म्हणाले, शिवाजी महाराज यांच्या आयुष्यात एकच तह झाला. हा तह मिर्झा राजे जयसिंग यांच्याबरोबर झाला होता. तहातील वाटाघाटीनुसार ते औरंगजेबाच्या दरबारात गेले होते. तेथे झालेला अपमान सहन न झाल्यामुळे तहात जेवढे किल्ले गेले होते, त्यापेक्षा दुप्पट किल्ले शिवाजी महाराजांनी औरंगजेबाकडून जिंकले होते.

    राज्यपाल कोश्यारींचा समाचार घेताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, मला वाटते शिवरायांबद्दल वक्तव्य करून जाणून बुजून महाराष्ट्राच्या भावना दुखवण्याचे काम केले जात आहे. राज्यपालांना वरच्यांचा (दिल्ली) आशिर्वाद आहे.

    जितेंद्र आव्हाड म्हणाले, महाराष्ट्र घडवणारे, महिलांना शिक्षण देणारे ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुलेंबद्दल त्यांनी वक्तव्य केली होती. काल शिवाजी महाराजांबद्दलही वक्तव्य केले. महाराष्ट्राच्या मातीचा अपमान केला, ते संदेश देत आहेत की, महाराष्ट्राचे लोक माझे काहीही बिघडवू शकत नाही. आता महाराष्ट्राच्या जनतेने जागे व्हावे, लक्षात घ्यावे. आम्ही तर छत्रपती शिवरायांसाठी खोट्या केसेस अंगावर घेऊन लढत आहोत.