शिरटी येथील वादग्रस्त शिक्षकास ग्रामस्थांची मारहाण; शाळेत हजर होण्यास मज्जाव

शिरटी (ता.शिरोळ) येथील वादग्रस्त शिक्षक निलेश बाळू प्रधाने यास ग्रामस्थांनी मारहाण करून शाळेत हजर होण्यास मज्जाव केला. तसेच या शिक्षकास शाळेत रुजू करून घेऊ नये त्यास बडतर्फ करावे, या मागणीसाठी शिरटी गाव आणि शिरटी हायस्कूल, शिरटी बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामस्थांनी एकमुखी घेतला.

    शिरोळ : शिरटी (ता.शिरोळ) येथील वादग्रस्त शिक्षक (Controversial Teacher) निलेश बाळू प्रधाने यास ग्रामस्थांनी मारहाण करून शाळेत हजर होण्यास मज्जाव केला. तसेच या शिक्षकास शाळेत रुजू करून घेऊ नये, त्यास बडतर्फ करावे, या मागणीसाठी शिरटी गाव आणि शिरटी हायस्कूल, शिरटी बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामस्थांनी एकमुखी घेतला. या घटनेमुळे गावात तणावपूर्ण वातावरण बनले आहे. वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला.

    शिरटी येथील शिरटी हायस्कूलमधील इयत्ता दहावीमधील सानिका नामदेव माळी या विद्यार्थिनींचा मृत्यू दीड वर्षांपूर्वी झाला होता. सानिकाच्या मृत्यूस सहायक शिक्षक निलेश प्रधाने कारणीभूत असल्याचा ठपका ठेवून शिरोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शिरोळ पोलिसांनी त्यास अटक केली होती. त्यानंतर निलेश प्रधाने हा जामीनावर मुक्त झाला. त्याने शाळेत रुजू होण्यासाठी कामगार न्यायालयात दाद मागितले होते. न्यायालयाने प्रधाने यास कामावर हजर करून घेण्याचे आदेश शिरटी हायस्कूलच्या प्रशासनाला दिले होते. पण येथील ग्रामस्थांनी निलेश प्रधाने हाच सानिका माळीच्या मृत्यूस कारणीभूत आहे. त्यास शाळेत हजर करून घेऊ नये, अशी मागणी केली आहे.

    काही दिवसांपूर्वी निलेश प्रधाने शाळेत हजर होण्यासाठी आला असता ग्रामस्थांनी त्यास हुसकावून लावले होते. शुक्रवारी सकाळी पुन्हा निलेश प्रधाने हा आपल्या चार समर्थकांसह शिरटी हायस्कूलमध्ये हजर होण्यासाठी आला होता, ही माहिती ग्रामस्थांना समजली. संतप्त ग्रामस्थांनी शाळेकडे धाव घेतली. संस्था ग्रामस्थांनी निलेश प्रधाने याच्या विरोधात घोषणाबाजी करून त्याला शाळेतून बाहेर काढले व प्रधाने संतप्त ग्रामस्थांनी चोप दिला.

    यावेळी त्याच्यासोबत असलेल्या चार समर्थकांनाही प्रसाद दिला. मारहाण होत असल्याचे पाहून त्या समर्थकांनी गाड्या, मोबाईल सोडून मिळेल त्या वाटेने धूम ठोकली. तसेच त्यांच्या साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले.