जिरेटोपाच्या वादावर प्रफुल पटेल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “यापुढे काळजी…”

छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रतिक असलेला जिरेटोप चढवल्यामुळे राज्यामध्ये संतापाची लाट उसळली. यानंतर आता प्रफुल्ल पटेल यांनी ट्वीट करत केलेल्या कृतीबद्दल दिलगीरी व्यक्त केली आहे.

    मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी येथून तिसऱ्यांदा उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी रोड शो करत मोठे शक्तीप्रदर्शन केले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व प्रफुल्ल पटेल उपस्थित होते. पंतप्रधान मोदींच्या भेटीवेळी प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान मोदी यांना जिरेटोप चढवला. छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रतिक असलेला जिरेटोप चढवल्यामुळे राज्यामध्ये संतापाची लाट उसळली. यानंतर आता प्रफुल्ल पटेल यांनी ट्वीट करत केलेल्या कृतीबद्दल दिलगीरी व्यक्त केली आहे.

    छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचे प्रतिक असलेला जिरेटोप शिवप्रेमींसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांच्या व्यतिरिक्त जिरेटोप इतरांना परिधान केलेला शिवप्रेमींना आवडलेला नाही. महाविकास आघाडीसह अनेक शिवप्रेमींनी प्रफुल्ल पटेल यांच्यावर नाराजी व्यक्त करत टीका केली होती. राज्यामध्ये संतापाची लाट उसळल्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी सोशल मीडियावर या संदर्भात पोस्ट केली आहे. तसेच या पुढे काळजी घेईल असे आश्वासन देखील प्रफुल्ल पटेल यांनी दिले आहे.

    काय म्हणाले प्रफुल्ल पटेल?

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिरेटोप परिधान केल्यानंतर प्रफुल्ल पटेल यांच्याबाबत रोष व्यक्त होत होता. याबाबत प्रतिक्रिया देताना पटेल म्हणाले, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आणि प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या आदर्शांवर व लोककल्याणाच्या मार्गावर मार्गक्रमण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान होईल, अशी कोणतीही गोष्ट कधी मनातही येऊ शकत नाही. यापुढे काळजी घेऊ. अशा शब्दांत प्रफुल्ल पटेल यांनी दिलगिरी व्यक्त केली.