पंतप्रधान मोदींना जिरेटोप घातल्याने संतापाची लाट; शिवाजी महाराजांचा अपमान केल्याने टीका, भाजप नेत्यांची सावरासावर

पंतप्रधान मोदी यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिक असलेला जिरेटोप परिधान केला. यानंतर महाराष्ट्रातील सर्व स्तरातून नाराजी व्यक्त केली जात आहे.

  मुंबई : लोकसभा निवडणूकीसाठी नरेंद्र मोदी यांनी वाराणसी येथून तिसऱ्यांदा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी भाजपकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. तसेच भाजपची सत्ता असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री देखील यावेळी उपस्थित होते. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह प्रफुल्ल पटेल देखील वाराणसीमध्ये होते. यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान मोदी यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिक असलेला जिरेटोप परिधान केला. यानंतर महाराष्ट्रातील सर्व स्तरातून नाराजी व्यक्त केली जात आहे. यानंतर राजकीय वर्तुळामध्ये संतापाची लाट उसळलेली असून भाजप नेत्यांकडून सावरासावर केली जात आहे.

  आपण काय करत आहोत?

  छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचे प्रतिक असलेला जिरेटोप महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचे प्रतिक आहे. फक्त छत्रपतीच जिरेटोर परिधान करु शकतात. जिरेटोपाशी महाराष्ट्रातील लोकांच्या भावना जोडलेल्या असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिरेटोप घातल्यामुळे राज्यातून संताप व्यक्त होत आहे. यावर शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी देखील नाराजी व्यक्त केली. ‘आपण काय करत आहोत, हे प्रत्येकाला कळायला हवे’ अशी प्रतिक्रिया अमोल कोल्हे यांनी दिली आहे.

  मोदीेंची मर्जी संपादन करण्यासाठी राज्यातील नेते किती लाचार

  पंतप्रधानांना जिरेटोप घातल्याने संभाजी ब्रिगेड देखील आक्रमक झाली आहे. खरमरीत प्रतिक्रिया देत संभाजी ब्रिगेडने खडेबोल सुनावले आहेत. संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज यांच्याव्यतिरिक्त अन्य कोणीही जिरेटोप परिधान करू नये, असा संकेत आहे. छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराज यांचा अभिनय करतानाही संपूर्ण वेशभूषा परिधान केल्यानंतर जिरेटोप परिधान करण्याचा प्रघात आहे. पंतप्रधान मोदी हे छत्रपती नाहीत. केवळ छत्रपती हा जिरेटोप परिधान करू शकतात. जिरेटोपाचा अवमान करण्यात येऊ नये. मोदी यांची मर्जी संपादन करण्यासाठी राज्यातील नेते किती लाचार होत आहेत, हे यावरून दिसून येते,” अशी बोचरी टीका संभाजी ब्रिगेडकडून करण्यात आली आहे.

  भाजप नेत्यांकडून सावरासावर

  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटायला गेल्यावर प्रफुल्ल पटेल यांनी त्यांच्या डोक्यावर जिरेटोप परिधान केला. यामुळे शिवप्रेमी जोरदार टीका करताना दिसत असताना भाजप नेत्यांकडून नरेंद्र मोदी यांच्यासाठी सावरासावर होताना दिसत आहे. उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, ‘जिरेटोपावरून राजकारण करू नये, ज्यांनी जिरेटोप घातला त्या पंतप्रधानांचा यात काय दोष? अशा प्रकारची पुनरावृत्ती होणार नाही,’ असे स्पष्टीकरण यांनी दिले. तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले,‘प्रफुल पटेल यांनी पंतप्रधान मोदी यांना जिरेटोप घातला त्यात मोदी यांचा काय दोष?’ असा सवाल बावनकुळे यांनी उपस्थित केला.