कॉर्डिलिया ड्रग्ज प्रकरण : आर्यनच्या क्लीनचीट विरोधातील याचिका मागे, न्यायालयाच्या दट्ट्यानंतर याचिकाकर्त्यांचा निर्णय

तपासयंत्रणेने चुकीच्या पद्धतीने आपल्या अधिकरांचा गैरवापर करत आर्यनसह अन्य काही जणांना प्रकरणातून वगळल्याचा आरोप प्रितम देसाई या विधी शाखेच्या विद्यार्थ्याने जनहित याचिकेतून केला होता. तसेच या प्रकरणात नव्याने सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी या याचिकाद्वारे करण्यात आली होती.

    मयुर फडके, मुंबई : कॉर्डेलिया क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात (Cordelia Cruz Drug Party Case) बॉलिवूड किंग शाहरुख खानचा (Bollywood King Shahrukh Khan) मुलगा आर्यनसह (Son Aryan Khan) अन्य काही आरोपींना एनसीबीने (NCB) आरोपपत्रातून क्लीनचीट (Clean Cheat) दिल्याविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका करण्यात आली होती.

    मात्र, न्यायालयाने ही जनहित याचिका कशी? त्यामागचे तुमचा याचिकेमागचा मूळ हेतू काय? प्रत्येक याचिका जनहित याचिका होत नाही? अशा प्रश्नांची सरबत्ती प्रभारी मुख्य न्या. संजय गंगापूरवाला यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्यांकडे केली. तसेच योग्य कशी हे पटवून द्या अन्यथा तुम्हाला मोठा आर्थिक दंड आकारू असा इशारा देताच याचिकाकर्त्यांनी याचिका बिनशर्त मागे घेतली.

    तपासयंत्रणेने चुकीच्या पद्धतीने आपल्या अधिकरांचा गैरवापर करत आर्यनसह अन्य काही जणांना प्रकरणातून वगळल्याचा आरोप प्रितम देसाई या विधी शाखेच्या विद्यार्थ्याने जनहित याचिकेतून केला होता. तसेच या प्रकरणात नव्याने सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी या याचिकाद्वारे करण्यात आली होती. त्यावर बुधवारी प्रभारी मुख्य न्या. संजय गंगापूरवाला आणि न्या. एस.जी. चपळगावकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

    मात्र, या प्रकरणी जनहित याचिका कशी होऊ शकते?, विद्यार्थ्यांना जनहित याचिका दाखल करायचीच असल्यास अन्यही अनेक विषय, समस्या आहेत. ही निव्वळ प्रसिद्धीसाठी केलेली याचिका असल्याचे प्रथमदर्शनी निरीक्षण नोंदवत ती योग्य कशी हे पटवून द्या अन्यथा तुम्हाला मोठा आर्थिक दंड आकारू असा इशारा खंडपीठाने याचिकाकर्त्यांना दिला न्यायालयाच्या दट्ट्यानंतर याचिकाकर्त्यांनी याचिका बिनशर्त मागे घेतली.

    एनसीबीने मागील वर्षी २ ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनसवर मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कार्डेलिया क्रूझवर छापा टाकला होता. यावेळी पाच ग्रॅम मेफ्रेडॉन, १३ ग्रॅम कोकेन, २१ ग्रॅम चरस, एमडीएमएच्या २२ गोळ्या आणि एक लाख ३३ हजारांची रोकड जप्त केली होती.

    क्रूझवरून आर्यन खानसह आठ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यानंतर आर्यन जवळपास महिनाभर तुरुंगात होता. सत्र न्यायालयाने जामीन नाकरल्यानंतर उच्च न्यायालयाने आर्यनला जामीन दिला होता. त्यानंतर या प्रकरणाचा तपास मुंबई एनसीबीकडून काढून घेतला, आणि एकेदिवशी आर्यन खानला पुराव्यांअभावी दिल्ली एनसीबीने मे २०२० मध्ये क्लीन चीट दिली. एनसीबीनं आर्यन खानसह ६ जणांची नावं आपल्या आरोपपत्रातून वगळली होती. एनसीबीकडून आरोपपत्रात आर्यन खान, आविन साहू, गोपाळ जी आनंद, समीर सेहगल, भास्कर अरोडा, मानव सिन्हा यांना क्लीन चिट देण्यात आली होती.