अत्यंत महत्त्वाची बातमी, लसीकरणासाठी लांब जाऊन रांग लावण्याचं टेन्शन संपलं, औषध दुकानदार होणार वॅक्सिनेटर

नागपुरात (Nagpur) नुकतीच तीन दिवसीय इंडियन फार्मास्युटिकल कॉन्फरन्स पार पडली. या कॉन्फरन्समध्ये औषध क्षेत्रातील विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. तसेच देशभरातील साडेबारा लाखपेक्षा जास्त नोंदणीकृत औषध विक्रेत्यांना यापुढे वॅक्सिनेटर म्हणून प्रशिक्षण देऊन लसीकरणामध्ये त्यांना सहभागी करुन घेण्याचे ही तत्वतः ठरवण्यात आलं आहे.

    नागपूर: कोरोना लसीकरणासंदर्भात (Corona Vaccination) एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. आता गल्ली बोळात असलेल्या औषध दुकानातूनही लसीकरण करून घेता येणार आहे. कोरोना महामारीच्या काळातील वाईट अनुभवातून केंद्र सरकार आणि इंडियन फार्मास्यूटिकल असोसिएशनने (Indian Pharmaceutical Association) एक मोठं पाऊल उचलण्याचं ठरवलं आहे. औषध विक्रेत्यांच्या औषधांच्या संदर्भातल्या ज्ञानाचा वापर आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी केला जाणार आहे.

    नागपुरात (Nagpur) नुकतीच तीन दिवसीय इंडियन फार्मास्युटिकल कॉन्फरन्स पार पडली. या कॉन्फरन्समध्ये औषध क्षेत्रातील विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. तसेच देशभरातील साडेबारा लाखपेक्षा जास्त नोंदणीकृत औषध विक्रेत्यांना यापुढे वॅक्सिनेटर म्हणून प्रशिक्षण देऊन लसीकरणामध्ये त्यांना सहभागी करुन घेण्याचे ही तत्वतः ठरवण्यात आलं आहे. यासाठी जागतिक आरोग्य संघटना आणि फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल फार्मास्युटिकलच्या देखरेखित इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन एक प्रशिक्षण कार्यक्रम आखणार आहे. त्यानंतर पुढील गोष्टी केल्या जाणार आहेत.

    पंधरा दिवसांचं ऑनलाईन आणि त्यानंतर पंधरा दिवसांचं ऑफलाइन प्रशिक्षण औषध विक्रेत्यांना दिलं जाणार आहे. हे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना लसीकरण करण्याची परवानगी दिली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. तसे झाल्यास विविध रोगांविरोधात लढण्यासाठी आवश्यक असलेलं लसीकरण, लसीकरणाच्या राष्ट्रीय कार्यक्रमात लहान मुलं आणि गर्भवती स्त्रियांसाठीचं लसीकरण यापुढे जवळच्या औषध विक्रेत्याच्या दुकानात जाऊन करता येणं शक्य होणार आहे.

    औषध विक्रेत्यांना लसीकरणासाठी सरकारने निश्चित केलेला दर आकारण्याची परवानगी राहणार आहे. भारताची प्रचंड लोकसंख्या पाहता भविष्यात कोरोना सारखी महामारी आल्यास आरोग्य यंत्रणा तोकडी पडू शकते. मात्र या नव्या निर्णयामुळे पुन्हा कोरोनासारखी परिस्थिती आल्यास लसीकरण करणं सोपं जाणार आहे. औषध विक्रेत्यांच्या माध्यमातून लसीकरणाची ही योजना भविष्यात क्रांतिकारक ठरणार अशीच अपेक्षा आहे. लोकांचाही ठराविक दवाखान्यासाठी लांबवर प्रवास करण्याचा वेळ वाचणार आहे. वैद्यकीय दृष्टिकोनातून वेळीच अनेक गोष्टी करणं शक्य होणार आहे. या नव्या निर्णयाचं लोकांकडून स्वागत होत आहे.