प्रेमीयुगलाचा आत्महत्येचा प्रयत्न, दोघेही जखमीच; पन्हाळ्यावरील पावनगडावरुन दरीत मारली उडी

राशिवडे बुद्रूक (ता. राधानगरी) येथील प्रेमीयुगलाने पन्हाळ्यावरील पावनगडावरून पंधरा फूट खोल दरीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यामध्ये दोघेही जखमी झाले. त्यांना कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

    पन्हाळा : राशिवडे बुद्रूक (ता. राधानगरी) येथील प्रेमीयुगलाने पन्हाळ्यावरील पावनगडावरून पंधरा फूट खोल दरीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यामध्ये दोघेही जखमी झाले. त्यांना कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रेम प्रकरणातून आत्महत्या करण्याचा त्यांचा प्रयत्न होता अशी प्राथमिक माहिती पोलिसांकडून समजते. संकेत नामदेव लाड (वय २२) व वैभवी उदय पाटील (वय २१, रा. दोघेही राशिवडे बुद्रूक) अशी त्यांची नावे आहेत.

    दोघेही गावांतील चांगल्या कुटुंबातील आहेत. सातवीपासून ते पन्हाळ्यावर ट्रेकींगला येत असत. त्यातून त्यांची चांगली ओळख व त्यातूनच प्रेम जुळल्याचे समजते. दुपारी बारा वाजता हे दोघेही पन्हाळागडावर आले होते. तिथे पावनगडाच्या दक्षिणेकडील तटावर ते बराच वेळ बसले होते. तेथूनच त्यांनी खाली उडी घेतली. तिथे असलेल्या दर्ग्याजवळ गेल्या कांही दिवसांपासून दोन पोलीस बंदोबस्तासाठी आहेत. त्यांनी त्यांना उडी घेताना पाहिले व तातडीने दरीत उतरून त्यांना बाहेर काढले. पन्हाळा पोलिसांनाही त्यांनी माहिती दिली.

    तरुणाच्या नाकातून रक्त येत होते. तरुणीस फारशी इजा झाली नव्हती. त्यांना तातडीने पन्हाळा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यासंबंधी पन्हाळा पोलिसांत आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरु होती.