चुलत बहिण भावाची गळफास घेत आत्महत्या; काय आहे कारण?

हिंगोली मधील आखाडा बाळापूर पोलीस स्थानकाच्या हद्दीतील डोंगरकडा गावात दोन सख्‍ख्या चुलत बहीण भावांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चौकशीनंतर या दोघांच्याही आत्महत्येचे कारण पुढे येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

    हिंगोली : हिंगोली मधील आखाडा बाळापूर पोलीस स्थानकाच्या हद्दीतील डोंगरकडा गावात दोन सख्‍ख्या चुलत बहीण भावांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

    डोंगरकडा गावातील ऐश्वर्या पंडित (वय 18) व आनंदा पंडित (वय 28) असे गळफास घेऊन जीवन संपवलेल्या चुलत बहीण भावांची नावे आहेत. ऐश्वर्या व आनंद हे दोघेही नात्याने सख्खे चुलत बहीण भाऊ असून ते डोंगरकडा गावातील एकाच गल्लीमध्ये राहायचे. सोमवारी सायंकाळी स्वतःच्या घरात बहिणीने तर रात्री भावाने शेतामधील झाडाला गळफास घेत जीवन संपवले.

    दरम्यान या घटनेची माहिती मिळताच बाळापूर पोलिसांनी दोघांचेही मृतदेह आखाडा बाळापूर येथील शवविच्छेदन कक्षात दाखल करत आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण बाळापुर परिसरासह पंडित कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

    मात्र या दोघांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले? याबाबत बाळापुर पोलिसांनी कोणतीही माहिती अद्यापपर्यंत दिलेली नाही. या घटनेचा बाळापूर पोलीस तपास करत असून पोलिसांच्या चौकशीनंतर या दोघांच्याही आत्महत्येचे कारण पुढे येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.