कोविड-१९ : शहरी भागातून काढता पाय; ग्रामीण भागातील २२ जिल्ह्यात अद्यापही स्थिती चिंताजनक : मंत्रिमंडळाने घेतला आढावा!

राज्यात तिसऱ्या लाटे दरम्यान, कोविड मृत्यूची संख्या दुसऱ्या लाटेच्या तुलनेने कमी असली, तरी मोठ्या संख्येने रुग्ण ग्रामीण भागात आढळून येत आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत साप्ताहिक रूग्णवाढीचे प्रमाण जास्त असल्याबाबत (पॉझिटिव्हिटी रेट) चिंता व्यक्त करण्यात आली.

  मुंबई : राज्यात कोरोनाचा (Corona) कहर शहरी भागातून काढता पाय घेत असल्याचे चित्र असले तरी ग्रामीण भागातील २२ जिल्ह्यात अद्यापही स्थिती चिंताजनक असल्याचा निष्कर्ष राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत करण्यत आलेल्या सादरीकरणातून आरोग्य विभागाने काढला आहे.

  मोठ्या संख्येने रुग्ण ग्रामीण भागात

  राज्यात तिसऱ्या लाटे दरम्यान, कोविड मृत्यूची संख्या दुसऱ्या लाटेच्या तुलनेने कमी असली, तरी मोठ्या संख्येने रुग्ण ग्रामीण भागात आढळून येत आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत साप्ताहिक रूग्णवाढीचे प्रमाण जास्त असल्याबाबत (पॉझिटिव्हिटी रेट) चिंता व्यक्त करण्यात आली. राज्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट २३. ८२ टक्के असून, त्या तुलनेत २२ जिल्ह्यांत पॉझिटिव्हिटी रेट सर्वाधिक आहे.

  २२ जिल्ह्यांत लसीकरण आणि चाचण्यांचा वेग वाढविणार

  राज्य आरोग्य विभागाच्या सादरीकरणानुसार, मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे आणि नाशिकमध्ये २० ते २६ जानेवारी या कालावधीत एकूण २, ७९, ६२१ पैकी कोरोनाचे १, ७६, ५८७ नवीन रुग्ण सापडले आहेत. तर उर्वरित १, ०२, ०३४ नवीन रुग्ण हे इतर जिल्ह्यांतील आहेत. ग्रामीण भागातील या २२ जिल्ह्यांमध्ये करोना प्रतिबंधक लसीकरण आणि चाचण्यांचा वेग वाढवण्यासह करोना प्रतिबंधक उपाययोजनांची अंमलबजावणी अधिक वेगाने करण्याच्या आवश्यकतेवरही मंत्रिमंडळाच्या बैठकीत अधिक भर देण्यात आला.

  २६ जानेवारीपर्यंत ओमिक्रॉनचे एकूण २८५८ रुग्ण

  उच्च रूग्णवाढ (पॉझिटिव्हिटी रेट) च्या यादीत नागपूर शहर आणि जिल्हा पहिल्या स्थानी आहे. नागपुरात पॉझिटिव्हिटी रेट ४४.५९ टक्के, पुणे ४२.४९ टक्के, नाशिक ४०. ९४ टक्के, गडचिरोली ३९.१८ टक्के, वर्धा ३८.११ टक्के, अकोला ३५.३१ टक्के, नांदेड ३४.४६ टक्के, वाशिम ३३.९४ टक्के, औरंगाबाद ३३.३४ टक्के, सांगली ३१.८९ टक्के, चंद्रपूर ३१.१८ टक्के, नंदुरबार २९.८५ टक्के, सातारा २९. ३१ टक्के, लातूर २८.९४ टक्के, सोलापूर २७.४१ टक्के, सिंधुदुर्ग २६. ९८ टक्के, भंडारा २६ टक्के, यवतमाळ २५.६७ टक्के, अमरावती २४.९३ टक्के, कोल्हापूर २४.६१ टक्के, गोंदिया २४.०५ टक्के आणि उस्मानाबादमध्ये साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट हा २४. ०२ टक्के इतका आहे. राज्यात ओमिक्रॉन व्हेरियंटच्या रुग्णांची आकडेवारी बघितली तर, २६ जानेवारीपर्यंत एकूण २८५८ रुग्ण आढळले आहेत.