कोयत्याने वार करून लुटणारे जाळ्यात ; लुटण्यात आलेला ऐवज जप्त

परराज्यातून ट्रेनिंगसाठी पुण्यात आलेल्या एका प्रवाशाला कात्रज चौकात मध्यरात्री कोयत्याने वारकरून लुटणाऱ्या टोळक्याला भारती विद्यापीठ पोलिसांनी सापळा रचून पकडले. एका अल्पवयीन मुलासह तिघांना पकडण्यात आले असून, त्यांच्याकडून लुटण्यात आलेला ऐवज जप्त केला आहे.

    पुणे :  परराज्यातून ट्रेनिंगसाठी पुण्यात आलेल्या एका प्रवाशाला कात्रज चौकात मध्यरात्री कोयत्याने वारकरून लुटणाऱ्या टोळक्याला भारती विद्यापीठ पोलिसांनी सापळा रचून पकडले. एका अल्पवयीन मुलासह तिघांना पकडण्यात आले असून, त्यांच्याकडून लुटण्यात आलेला ऐवज जप्त केला आहे.

    राजु नावनाथ कांबळे उर्फ काळ्या (वय २०, रा. पद्मावती), अथर्व रविंद्र आडसुळ (वय २०) यांना अटक केली आहे. तर, त्यांच्या एका अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार, पोलीस उपनिरीक्षक धिरज गुप्ता, सचिन सरपाले, निलेश खैरमोडे, राहुल तांबे, विक्रम सावंत व त्यांच्या पथकाने केली आहे.

    तक्रारदार हे परराज्यातील असून, त्यांच्या कंपनीचे ट्रेनिंग असल्याने ते पुण्यात आले होते. पहाटे साडे चारला ते कात्रज चौकात उतरले होते. पायी चालत ते मुक्कामाच्या ठिकाणी जात असताना दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी त्यांना पत्ता विचारण्याचा बहाणा केला. पण, अचानक त्यांच्या खिशातील रोकड जबरदस्तीने घेतली. तर, त्यांचा मोबाईल देखील हिसकावण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तक्रारदारांनी विरोध केला असता त्यांच्या डोक्यात कोयता मारून त्यांच्याकडील मोबाईल हिसकावून पोबारा केला होता. त्यांनी तत्काळ पोलिसांत तक्रार दिली होती. या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ निरीक्षक विजय कुंभार यांच्या सचूनेनुसार पथकाने सुरू केला होता. यादरम्यान, पोलीस अंमलदार अवधुत जमदाडे, अभिनव चौधरी, आशिष गायकवाड यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, हा गुन्हा संबंधित आरोपींनी मिळून केला आहे. त्यानूसार, त्यांचा शोध सुरू केला. माहिती मिळताच वरिष्ठ निरीक्षक विजय कुंभार व त्यांच्या पथकाने त्यांना पकडले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबूली दिली. त्यांच्याकडून गुन्ह्यात गेलेली रक्कम व मोबाईल जप्त केला आहे. तसेच, गुन्ह्यात वापरलेली दुचाकीही पोलिसांनी पकडली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.