पर्यावरण कर न भरणाऱ्यांना दणका; आरटीओकडून वाहनधारकांवर कडक कारवाई

वाहनाला १५ वर्षे होऊनही पर्यावरण कर न भरणाऱ्यांवर पुणे प्रादेशिक परिवहन खात्याच्या अधिकाऱ्यांनी (आरटीओ) कडक कारवाई सुरु केली आहे. त्यामुळे जुन्या वाहनधारकांनी दंडाची कारवाई टाळण्यासाठी हा कर वेळेत भरणे आवश्यक आहे.

  पुणे : वाहनाला १५ वर्षे होऊनही पर्यावरण कर न भरणाऱ्यांवर पुणे प्रादेशिक परिवहन खात्याच्या अधिकाऱ्यांनी (आरटीओ) कडक कारवाई सुरु केली आहे. त्यामुळे जुन्या वाहनधारकांनी दंडाची कारवाई टाळण्यासाठी हा कर वेळेत भरणे आवश्यक आहे.

  १५ वर्ष पूर्ण होऊनही पर्यावरण कर न भरणाऱ्या वाहनांवर आरटीओने दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. हा कर न भरणाऱ्या वाहनांवर आता नजर ठेवली जात आहे. जानेवारी महिन्‍यात तब्‍बल ५६ लाखांची दंडात्मक कारवाई आरटीओने केली आहे. एकूण २ हजार २०५ वाहनधारकांवर ही कारवाई करण्यात आली आहे.

  वाहनाला १५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर शासनाचा पर्यावरण कर भरणे आवश्यक आहे. अन्यथा प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने वाहनचालकांकडून कराची रक्कम वसूल करण्यात येते. त्यासोबतच दंडदेखील आकारण्यात येतो.

  विहीत मुदतीत पर्यावरण कर भरल्यास दुचाकी वाहनांसाठी पाच वर्षांकरिता २ हजार रुपये, तर चारचाकी (पेट्रोल) ३ हजार रुपये व डिझेल वाहनांसाठी ३ हजार ५०० रुपये तसेच रिक्षासाठी ७५० रुपये पर्यावरण कर म्हणून आकारला जातो.

  जुन्या वाहनांचा पर्यावरण कर भरून घेताना त्या वाहनामुळे प्रदूषण होत आहे किंवा नाही याची खात्री करून घेतली जाते. तसेच सुरक्षित वाहतुकीसाठीचे निकष ते पूर्ण होत असतील तरच हा कर भरून घेतला जातो. डिसेंबर महिन्यात वाहनांची तपासणी करण्यात आली. यामध्ये काही जणांनी पर्यावरण कर न भरल्याचे आढळले. त्यांच्यावर नियमानुसार कारवाइ करण्यात आली.

  डिसेंबर महिन्यात एकूण 23 हजार 770 रुपये पर्यावरण कर व दंड २९ हजार रुपये असा सुमारे ५२ हजारांचा कर वसूल करण्यात आला होता. हा आकडा ५६ लाख १२ हजार रुपयांवर पोहचला आहे. तर २ हजार २०५ वाहनांवर ही कारवई करण्यात आली असल्‍याची माहिती पिंपरी-चिंचवड उप प्रादेशिक परिवहन विभागाने दिली.

  प्रदूषण होऊ नये हा उद्देश

  १५ वर्षे पूर्ण झालेल्‍या वाहनांसाठी पर्यावरण कर आकारला जात आहे. या वाहनाद्वारे प्रदुषण होऊ नये, असा उद्देश आहे. असा कर न भरणाऱ्यांवर कार्यालयाच्‍या वतीने कारवाई केली जात असल्याचे पिंपरी-चिंचवडचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी स्पष्ट केले आहे.