शहरातून तडीपार केलेल्या गुन्हेगाराला गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या

दोन वर्षांसाठी तडीपार केलेल्या गुन्हेगाराला विनापरवाना शहरात आल्यानंतर गुन्हे शाखेने पाठलाग करून बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून दोन पिस्तूल आणि तीन जिवंत काडतूसे जप्त करण्यात आली आहेत.

    पुणे : शहरातून दोन वर्षांसाठी तडीपार केलेल्या गुन्हेगाराला विनापरवाना शहरात आल्यानंतर गुन्हे शाखेने पाठलाग करून बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून दोन पिस्तूल आणि तीन जिवंत काडतूसे जप्त करण्यात आली आहेत. आर्म अॅक्ट तसेच शरिराविरूद्धचे त्याच्यावर ५० हून अधिक गुन्हे दाखल आहेत. रोहन उर्फ दुध्या सुभाष चव्हाण (रा. सोमवार पेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात आर्म अॅक्टचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    शहरात पिस्तूलांचा धाक दाखवून लुटमारीच्या घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर आरोपींची माहिती काढली जात आहे. या दरम्यान, युनिट दोनचे पथक हद्दीत गस्त घालत होते. यावेळी सराईत गुन्हेगार व तडीपार रोहन उर्फ दुध्या मंगळवार पेठेत उभा असून, त्याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती मिळाली होती. त्यानूसार, सहाय्यक आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील व पथकातील निखील जाधव व त्यांच्या पथकाने त्याला पकडण्यासाठी सापळा रचला. परंतु, पोलिस पाहताच त्याने पळ काढला. पथकाने त्याला काही अंतर पाठलागकरून पकडले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर तो दोन वर्षांसाठी शहरातून तडीपार केलेला असल्याचे समोर आले. त्याची झडती घेतली असता, दोन पिस्तूल व एक मॅगझिन मिळून आले. त्याला ताब्यात घेऊन सखोल तपास केल्यानंतर आणखी तीन पिस्तूल आणि काडूतसे त्याच्याकडून जप्त करण्यात आली.

    रोहन उर्फ दुध्या हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर शरिराविरूद्धचे, जबरी चोरी व आर्म अॅक्टचे ५० हून अधिक गुन्हे दाखल आहेत. तो तडीपार असताना देखील विनापरवाना शहरात आला होता. त्याने हे पिस्तूल कोठून व कोणासाठी आणले होते, याचा तपास केला जात आहे.