अमली पदार्थ विक्रेत्यांवर गुन्हे शाखेची धडक कारवाई; २५ लाखांचे मेफेड्रोन जप्त; वेगवेगळ्या भागांत कारवाई

  पुणे : पुण्यातील ससून रुग्णालयाच्या गेटवर कारवाई करीत पुणे पोलिसांनी ड्रग्ज तस्कर ललित पाटील याच्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. त्याच्याकडून दोन कोटींचे मेफेड्रोन जप्त केल्यानंतर आता पोलिसांनी या तस्करांवर नजर ठेवून कारवाई सुरु केली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कारवाई थंडावली असल्याने वरिष्ठांकडून याची दखल घेत कानउघडणी केली होती. आता गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने तस्करांवर करडी नजर ठेवत धडक कारवाई सुरू केली असून, हडपसर, लष्कर, फरासखाना आणि बंडगार्डन परिसरात कारवाई करून पाच जणांना पकडले आहे.

  या कारवाईत त्यांच्याकडून २५ लाख रुपयांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सुनील तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, योगेश मोहिते, सुजीत वाडेकर, मारुती पारधी, प्रवीण उत्तेकर यांनी केली.

  हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

  अमली पदार्थ तस्करांवर लक्ष ठेवले जात असताना हडपसरमधील केशवनगर-मांजरी भागात एक जण मेफेड्रोन विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून शिवम शिवप्रसाद सोनुने (वय २१, घुलेनगर, वाघोली) याला पकडले. त्याच्याकडून १ लाख ६ हजारांचे मेफेड्रोन व १० हजार रुपयांचा मोबाइल जप्त करण्यात आला आहे. सोनुने याच्याविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  एक लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

  दुसऱ्या कारवाईत गणेश पेठेती डुल्या मारुती परिसरात एका तरुणाला संशयातून पकडले. त्याच्याकडून ६० हजार रुपयांचे ३ ग्रॅम मेफेड्रोन आणि दुचाकी असा एक लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अरबाज रफिक बागेवाडी (वय २६, मीठानगर, कोंढवा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी त्याचा साथीदार अफाक अन्सार खान (रा. गणेश पेठ) याच्याविरुद्ध फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच लष्कर भागात करण्यात आलेल्या कारवाईत मोहम्मद अल्ताफ पटेल (वय २४, महात्मा गांधी रस्ता) याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून एक लाख ६ हजार रुपयांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले असून, याप्रकरणी गुन्हा नोंद केला आहे.

  तर बंडगार्डन परिसरात एक जण अमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. सापळा लावून वीरेश नगीनभाई रुपासरी (वय ५३, रा. विलेपार्ले, मुंबई, मूळ रा. सिल्व्हासा, दादरानगर हवेली) याला ताब्यात घेतले होते. रुपासरीकडून २१ लाख ५२ हजार किंमतीचे १०७ ग्रॅम मेफेड्रोन, सहा हजार ४०० रुपये रोख, वजन काटा आणि २० हजाराचा मोबाईल असा २२ लाख ३७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.

  बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

  रुपासरीविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे करत होते. रुपासरी हा अमजद हसमत अली सय्यद उर्फ सनी उर्फ फैयज (वय-४८, सांताक्रुज इस्ट, मुंबई) याच्या मदतीने मेफेड्रोनची विक्री करत असल्याचे माहिती मिळाली होती. यानंतर अमजद हसमत अली सय्यद हा दुबईला पळून जाणार असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी दुबईला पसार होण्याच्या तयारीत असलेल्या अमजद सय्यद याला मीरा भाईंदर येथून ताब्यात घेतले. आता या पाच जणांकडे पोलीस कसून तपास करत आहेत.