वडगावात गुन्हेगारांचा सुळसुळाट; भरदिवसा घडताहेत गुन्हे, व्यापाऱ्यांना धमकावून खंडणी केली जाते वसूल

मावळ तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडगाव नगरपंचायत (Vadgaon Nagar Panchayat) हद्दीमध्ये गेल्या काही महिन्यांपासून संघटित गुन्हेगारीत वाढ होत आहे. भर दिवसा कोणावरही वार, तोडफोड, धमकवणे, छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांना धमकावून खंडणी वसूल केली जाते.

    वडगाव मावळ : मावळ तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडगाव नगरपंचायत (Vadgaon Nagar Panchayat) हद्दीमध्ये गेल्या काही महिन्यांपासून संघटित गुन्हेगारीत वाढ होत आहे. भर दिवसा कोणावरही वार, तोडफोड, धमकवणे, छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांना धमकावून खंडणी वसूल केली जाते. चार दिवसांपूर्वी तीन तरुणांच्या टोळक्याने (Crime News) एका व्यापाऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली. अशा घटनांमुळे वडगाव शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

    याबाबत वडगाव पोलीस ठाण्यात स्थानिकांकडून निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, वडगाव शहरात गुन्हेगारांना आता पोलिसांचा धाकच उरला नाही, असं चित्र दिसत आहे. गेल्या काही महिन्यांपासून वाटेल तिथे दहशत माजवत आहेत. आपलं वर्चस्व निर्माण करण्यासाठी भर दिवसा कोणावरही वार, तोडफोड, व्यापाऱ्यांना धमकावून खंडणी मागितली जाते. ती दिली नाही तर मारहाण करून राजरोसपणे वसूल केली जात आहे. व्यापारी बांधवांना पोलीस प्रशासनाकडून ठोस सुरक्षेची हमी नसल्यामुळे ते तक्रार देण्यास पुढे येत नाही.

    शहरात गुन्हेगारांची दहशत वाढतेय

    वडगाव शहर हे तालुक्याचे मुख्यालय असून, या ठिकाणी अनेक शासकीय कार्यालये, कोर्ट, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था या आहेत. त्यामध्ये शिक्षण घेणारे अनेक विद्यार्थी/विद्यार्थ्यांना देखील गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींमुळे घाबरले आहेत.