झेडपीतील अधिकारी, लिपिकांवर फौजदारी करा, शिक्षक संघटनाचा ठराव

करमाळा तालुक्यातील कावळवाडी झेडपी शाळेतील शिक्षकाच्या बेकायदा बदलीवरून वाद निर्माण झाला आहे. अशा बेकायदा बदल्या करण्यासाठी झेडपीच्या शिक्षण विभागात एजंटगिरी सुरू असून अनुकंपा भरतीच्यावेळीही या एजंटाने बाजार मांडला होता, असा आरोप शिक्षक संघाचे नेते शिवानंद भरले यांनी केला होता.

   

  सोलापूर: जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या बेकायदा बदली प्रकरणात गुंतलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर फौजदारी करण्याचा ठराव सोलापूर जिल्हा शिक्षक पतसंस्थेच्या बैठकीत शनिवारी घेण्यात आला.

  करमाळा तालुक्यातील कावळवाडी झेडपी शाळेतील शिक्षकाच्या बेकायदा बदलीवरून वाद निर्माण झाला आहे. अशा बेकायदा बदल्या करण्यासाठी झेडपीच्या शिक्षण विभागात एजंटगिरी सुरू असून अनुकंपा भरतीच्यावेळीही या एजंटाने बाजार मांडला होता, असा आरोप शिक्षक संघाचे नेते शिवानंद भरले यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर शनिवारी जिल्हा शिक्षक पतसंस्थेच्या कार्यालयात शिक्षक संघटनांची एकत्रित बैठक झाली. या बैठकीला शिवानंद भरले, अंकूश काळे, म.ज.मोरे, बाळासाहेब काळे, हरिष कडू , इकबाल नदाफ, झुल्फीकार मुजावर, विद्याधर शिवशरण, राजकूमार राऊत, नवनाथ धांडोरे, बाबासाहेब दराडे, मसूद सिध्दकी उपस्थित होते.

  या बैठकीत जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागात सुरू असलेल्या सावळ्या गोंधळावर गंभीर चर्चा करण्यात आली. शिक्षकांच्या बदली व नियुक्त्यामध्ये बेकायदेशीरपणाचा अवलंब व अनियमितता करणाऱ्या अधिकारी, लिपीकांवर फौजदारी करण्याचा ठराव एकमतनं मंजूर करण्यात आला तसेच शिक्षण विभागाने बेकायदेशीरपणे केलेली बदली रद्द करण्यासाठी प्रशासनावर दबाव वाढविण्याचा यावेळी निर्णय घेण्यात आला. कावळवाडी शिक्षकाच्या बदलीवरून बैठकीय बराच वेळ वादळी चर्चा झाली सर्वांनी या विरोधात एकमताने लढा देण्याचे ठरविले आहे.

  ‘त्या’ पीएवर सर्वांचा रोष
  शिक्षकांची बेकायदेशीर कामे करण्यासाठी करण्यासाठी प्राथमिक शिक्षण विभागात एजंटांनी ठाण मांडले आहे. त्यात एका आमदाराचा “पीए’ आघाडीवर आहे. अगोदर या एजंटांना हाकला व झालेली बेकायदा बदली रद्द करा या मागणीसाठी एकजूट होण्याचा निर्धार शिक्षक संघटनांच्या बैठकीत यावेळी व्यक्त करण्यात आला. संबंधित आमदाराला पीएच्या काळ्या धंद्याची माहिती देण्याचे यावेळी ठरवण्यात आले.