सराईत गुन्हेगारांकडून अपहृत गुन्हेगाराची हत्या; मृतदेह जाळत पुरावा नष्ट करण्याचाही केला प्रयत्न

परिसरातून आर्थिक वादातून एका सराईत गुन्हेगाराचे अपहरण करून त्याची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. यातील संशयित सराईत गुन्हेगारांनी या युवकाचा मृतदेह मोखाडा येथे जाळून फेकून देत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात पुढे आले आहे.

    पंचवटी : परिसरातून आर्थिक वादातून एका सराईत गुन्हेगाराचे अपहरण करून त्याची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. यातील संशयित सराईत गुन्हेगारांनी या युवकाचा मृतदेह मोखाडा येथे जाळून फेकून देत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात पुढे आले आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात पाच संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सराईत गुन्हेगार संदेश चंद्रकांत काजळे (३५, रा. सीताराम चेंबर्स, पेठफाटा, पंचवटी, नाशिक) याचे आर्थिक वादातून शुक्रवारी (दि. ९) रात्री दोनच्या सुमारास संशयित नितीन उर्फ पप्पू कचरू चौघुले, रणजित संजय आहेर, स्वप्नील दिनेश उन्हवणे (२३, तिघे रा. राजवाडा, पंचवटी), पवन संजय भालेराव (रा. प्रभात वंदन अपार्टमेंट, मालेगाव स्टॅण्ड), करण अनिल डेंगळे (रा. त्र्यंबकेश्वर) यांच्याशी निमाणी बस स्टॅण्डसमोरील इमारतीच्या पार्किंगमध्ये दारू पिताना गाडीच्या पैशांवरून शाब्दिक वाद झाला.

    यावेळी संशयित रणजित आहेर याने संदेशच्या डोक्यात बियरची बाटली फोडून त्याला आपल्या साथीदारांच्या मदतीने चारचाकी वाहनात टाकून नेत अपहरण केले. याबाबत संदेशचा चुलतभाऊ प्रितेश विलास काजळे (३२, रा. माताजी चौक, विजयनगर, नवीन सिडको; मूळ रा. आडगाव, नाशिक) याने पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

    याबाबत पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांनी तपासाची चक्रे फिरवत संशयित स्वप्नील उन्हवणे याला ताब्यात घेतले, पोलिसी खाक्या दाखवताच स्वप्नीलने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली.