गोदावरीच्या पुराचा निफाड तालुक्यातील शेती पिकांना फटका

या पुराचे पाणी नांदूर मधमेश्वर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दाखल होत असल्याने धरणाच्या बॅक वॉटरला असलेल्या चांदोरी, सायखेडा, शिंगवे, चापडगाव, भुसे आणि करंजगाव या गावातील नदीकाठच्या शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने कांदा, ऊस, सोयाबीन, टोमॅटो, भुईमूग, मूग या पिकांना फटका बसला आहे.

    नाशिक : गेल्या सहा दिवसापासून नाशिक जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. या पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या पश्चिम भागात असलेल्या तालुक्यांमध्ये तसेच निफाड तालुक्यातील गोदाकाठ परिसरात असलेल्या गावातील शेती पिकांना फटका बसला आहे. यामुळे शेतकऱ्यांच मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

    नाशिक जिल्ह्यातील पश्चिमेकडील त्रंबकेश्वर, इगतपुरी आणि दिंडोरी तालुक्यात पावसाने सहा दिवस जोरदार बॅटिंग केल्यामुळे दारणा आणि गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येतो. यामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे.  या पुराचे पाणी नांदूर मधमेश्वर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दाखल होत असल्याने धरणाच्या बॅक वॉटरला असलेल्या चांदोरी, सायखेडा, शिंगवे, चापडगाव, भुसे आणि करंजगाव या गावातील नदीकाठच्या शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने कांदा, ऊस, सोयाबीन, टोमॅटो, भुईमूग, मूग या पिकांना फटका बसला आहे. शेतातील पिकं पाण्यातच असल्याने सडण्याची शक्यता असल्यामुळे  मोठे नुकसान शेतकऱ्यांचे होणार आहे.  नांदूरमधमेश्वर धरणातून पाण्याचे विसर्ग होणाऱ्या पाण्याच्या उपलब्धतेनुसार नियोज केले असते तर शेतीचे नुकसान झाले नसते अशी प्रतिक्रीया येथील शेतकऱ्यांनी दिली आहे. योग्य नियोजन केल्यास शेतीचे नुकसान टाळता येईल, त्यामुळे याकडेही प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी करत,  नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी आता करीत आहे.