Crowd to greet Chhatrapati Sambhaji Maharaj at Fort Purandar

  सासवड : पुरंदर तालुक्यातील किल्ले पुरंदर येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. महाराजांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून शंभू भक्तांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. रात्री १२ वाजे पासून शंभू भक्त ज्योत घेवून येत होते. छत्रपती संभाजी महाराज कि जय च्या घोषणांनी किल्ल्याचा संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता. भगवे झेंडे, लाल, गुलाबी, भगवे फेटे, ढोल ताशांचा गजर आणि सनई आणि तुतारीच्या निनाद, किल्ल्यावर फुलांची केलेली सजावट, पाळणा गीत, उपस्थितांना महाप्रसाद, आणि मान्यवरांचे सत्कार यामुळे कार्यक्रमात मोठी रंगत आली होती.

  छत्रपती संभाजी महाराज यांच्या जन्मस्थळावरील पुतळ्यास अभिवादन

  पुरंदर किल्ल्यावरील श्री महादेव मंदिरात सकाळी ८. वा. शासकीय महापूजा करण्यात आली. त्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या जन्मस्थळावरील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. पुरंदरचे आमदार संजय जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई, प्रांताधिकारी वर्षा लांडगे, तहसीलदार विक्रम रजपूत, गटविकास अधिकारी डॉ. अमिता पवार, गटशिक्षणाधिकारी निलेश गवळी, सासवड नगर परिषदेचे मुख्याधिकारी कैलास चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विक्रम काळे, राज्य बांधकाम विभागाच्या अभियंता स्वाती दहिवाल यांच्यासह विविध विभागांचे प्रतिनिधी, शिक्षक संघटनांचे नेते, प्रतिनिधी, शिक्षक आणि हजारो शंभू भक्त उपस्थित होते.

  विविध संघटनाचे प्रतिनिधी उपस्थित

  छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर स्वाती कटके, स्वाती जगताप, वनिता टिळेकर, छाया जगदाळे आदींसह उपस्थित महिलांनी पाळणागीत म्हंटले. त्यानंतर उपस्थितांना प्रसाद म्हणून सुंठवडा वाटप करण्यात आला. दरम्यान पुरंदर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत पाटणे यांच्या मार्ग दर्शनाखाली जन्मस्थळावर फुलांची सजावट करण्यात आली होती. उपस्थितांना शाल श्रीफळ देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी माजी जिप सदस्य दत्तात्रय झुरंगे, प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष प्रकाश शिंदे, रणजीत बाठे, योगेश देशमुख, रविराज शिंदे, उमेश खोबे आदी उपस्थित होते. तसेच मराठा महासंघाचे राजाभाऊ जगताप, संदीप जगताप,नंदू जगताप, नारायणपूरचे सरपंच प्रदीप बोरकर, चंद्रकांत बोरकर, सुनील क्षिरसागर यांच्यासह विविध संघटनाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

  शासकीय सोहळा नावापुरताच; इतर कोणत्याही सुविधा नाहीत.

  शासनाने किल्ले पुरंदर येथे मागील वर्षापासून छत्रपती संभाजी महाराज यांची शासकीय जयंती साजरी करण्याचे आदेश काढले. मात्र शासकीय सुविधा कोणत्याही उपलब्ध केल्या नाहीत. याबद्दल राज्यातील शंभू भक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे. शासकीय महापूजा करताना शासनाने सकाळी १०.वा कार्यक्रम घेणे अपेक्षित असताना राज्यातील हजारो शंभू भक्त तसेच विविध संघटना सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा करीत असताना अधिकारी मात्र सकाळी ७. वाजताच पूजा करून निघून जातात. याव्यतिरिक्त उपस्थित हजारो नागरिकांसाठी पाण्याची सोय, जेवण, मान्यवरांचे सत्कार, मंडप तसेच संभाजी राजांना पोलिसांच्या वतीने सलामी देणे अपेक्षित आहे. किल्ले शिवनेरी, प्रतापगड येथे सर्व सुविधा आणि निधी देत असताना पुरंदर किल्ल्याच्या बाबतीत शासन दुजाभाव का करीत आहे ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.