पक्षांतर करणाऱ्यांच्या स्वप्नांचा चुराडा! बीआरएसमध्ये प्रवेश केलेल्या नेत्यांच्या भूमिकेकडे लक्ष ?

पाचशे गाड्यांचा ताफा घेऊन आपल्या संपूर्ण मंत्रिमंडळासह महाराष्ट्रात जबरदस्त एन्ट्री करणाऱ्या तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री बीआरएस पक्षाचे नेते के. चंद्रशेखर राव यांचा नुकत्याच झालेल्या तेलंगणा विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाला.

  पंढरपूर : पाचशे गाड्यांचा ताफा घेऊन आपल्या संपूर्ण मंत्रिमंडळासह महाराष्ट्रात जबरदस्त एन्ट्री करणाऱ्या तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री बीआरएस पक्षाचे नेते के. चंद्रशेखर राव यांचा नुकत्याच झालेल्या तेलंगणा विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाला.

  के. चंद्रशेखर राव यांनी तेलंगणा राज्यात राबविलेल्या योजनांवर प्रभावित होऊन सोलापूर शहर जिल्ह्यातील अनेक मोठ्या नेत्यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला होता. मात्र तेलंगणा विधानसभा निवडणुकीत कांॅग्रेसने बीआरएसचा माेठा पराभव केल्याने त्यांच्या स्वप्नांचा मात्र चुराडा झाला आहे. आता हे नेते काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण सोलापूर शहर जिल्ह्याचे राजकीय लक्ष लागले आहे.

  के. सी. आर यांनी सोलापूर जिल्ह्यात धमाकेदार एन्ट्री करत पंढरपूरच्या पांडुरंगाचे दर्शन घेतले. त्यांच्यावर प्रभावी होऊन माजी आमदार भारत भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांनी बीआरएस पक्षांमध्ये दिमाखात प्रवेश केला. हा प्रवेश सोहळा संपूर्ण राज्यामध्ये चर्चेला गेला. यावेळी आपल्या भाषणातून केसीआर यांनी महाराष्ट्राला समृध्द करण्याचे स्वप्न दाखवले. त्यानंतर त्यांचा प्रभाव सोलापुरात आणखीच वाढला.
  भाजपमधील सत्ताधारी नगरसेवकांनी हैदराबादमध्ये जाऊन प्रवेश केला. त्यामध्ये नागेश वल्याळ, राजश्री चव्हाण, संतोष भोसले, जुगनबाई आंबेवाले यांच्यासह पद्मशाली समाजात मोठं प्रस्थ असलेले पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप यांचा समावेश होता. ग्रामीण भागात ही बीआरएस पक्षाची क्रेझ पाहायला मिळाली. दक्षिण सोलापूर तालुक्यातील अनेक सरपंच आपल्या असंख्य गाड्यांच्या ताफ्याने हैदराबादला जाऊन प्रवेश मिळवला.

  तेलांगणातील पराभवाने आशेवर पाणी
  बीआरएसच्या माध्यमातून अनेकांना सत्तेचे स्वप्न पडले होते, परंतु नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत स्वतः केसीआर यांचा पराभव झाला. आणि बीआरएसची सत्ताही गेली. पक्षांतर केलेल्या या मोठ्या नेत्यांनी त्यांच्या आशेवर पाणी फिरले गेले आहे. आता यांची भूमिका काय असणार याकडे मात्र सर्वांच्या नजरा लागल्या आहेत