‘सीएसके आयस्क्वॉश करंडक’ २०२३ खुल्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्क्वॉश स्पर्धा

आरव कोत्तापल्ली, मोहम्मद तोहीदतनवीर, स्वरीत पाटील, हृदान शहा, आकाश कनन, निष्कल द्विवेदी, अर्णा पांड्ये, शनाया रॉय, गोशिका एम, अरिका मिश्रा यांना विजेतेपद !!

  पुणे : आयस्क्वॉश अ‍ॅकॅडमीतर्फे ‘सीएसके आयस्क्वॉश करंडक’ २०२३ खुल्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्क्वॉश स्पर्धेत आरव कोत्तापल्ली, मोहम्मद तोहीदतनवीर, स्वरीत पाटील, हृदान शहा, आकाश कनन यांनी मुलांच्या गटात, तर निष्कल द्विवेदी, अर्णा पांड्ये, शनाया रॉय, गोशिका एम, अरिका मिश्रा यांनी मुलींमध्ये वेगवेगळ्या गटांचे विजेतेपद संपादन केले.

  सरळ फ्रेममध्ये पराभव

  चंचला संदीप कोद्रे (सीएसके) स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, मुंढवा येथे सुरू असलेल्या या स्पर्धेच्या ९ वर्षांखालील मुलांच्या गटात अव्वल मानांकित आरव कोत्तापल्ली याने तिसर्‍या मानांकित वेदांत शिंदे याचा ११-२, ११-३, ११-७ असा पराभव केला. मुलींच्या गटात दुसर्‍या मानांकित अर्णा पांड्ये हिने अरीना अलमोउला हिचा ११-२, ११-२, ११-० असा सरळ फ्रेममध्ये पराभव करून विजेतेपद मिळवले.

  ११ वर्षाखालील मुलांच्या गटातील विजेते
  ११ वर्षाखालील मुलांच्या गटात व्दितीय मानांकित मोहम्मद तोहीदतनवीर याने बिगर मानांकित ऋषभ शाम याचा १३-११, ८-११, १३-११, ८-११, ११-९ असा संघर्षपूर्ण पराभव करून विजेतेपदावर नाव कोरले. मुलींच्या गटामध्ये अव्वल मानांकित शनाया रॉय तिसर्‍या मानांकित महीका सुब्रमण्यम हिचा ११-२, ११-९, ६-११, ११-३ असा पराभव करून विजतेपद संपादन केले.
  १३ वर्षाखालील मुलांमधील विजेते
  १३ वर्षाखालील मुलांमध्ये अव्वल मानांकित स्वरीत पाटील याने व्दितीय मानांकित विवान खन्ना याचा १२-१०, १२-१०, ११-७ असा पराभव करून विजेतेपद मिळवले. मुलींमध्ये बिगर मानांकित गोशिका एम. हिने दुसर्‍या मानांकित मिरा क्रेसेजल हिचा ११-४, १४-१२, ११-४ असा पराभव करून विजेतेपद मिळवले.
  १५ वर्षाखालील मुलांच्या गटामधील विजेते

  १५ वर्षाखालील मुलांच्या गटामध्ये अव्वल मानांकित हृदान शहा याने व्दितीय मानांकित लक्ष्मणा हरी याचा ११-४, ११-४, ११-७ असा पराभव करून विजेतेपद मिळवले. याच गटात मुलींमध्ये व्दितीय मानांकित अरीका मिश्रा हिने अव्वल मानांकित इशा श्रीवास्तवा हिचा ११-९, ११-४, ११-५ असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदवित विजेतेपद मिळवले.

  १७ वर्षाखालील मुलांमधील विजेते

  १७ वर्षाखालील मुलांमध्ये अव्वल मानांकित आकाश कनन याने पाचव्या मानांकित मितांश जैन याचा ११-५, १३-११, ११-९ असा पराभव करून विजेतेपदावर आपले नावे कोरले. १९ वर्षाखालील मुलांच्या गटात तिसर्‍या मानांकित निष्कल दिवेदी याने अव्वल मानांकित मय्यपन एल. याचा ११-५, ११-३, ११-७ असा पराभव करून विजेतेपद मिळवले.

  स्पर्धेचे पारितोषिक वितरण आयस्क्वॉश अ‍ॅकॅडमीचे संचालक मरीषा जिल्का आणि असिफ सय्यद आणि सहसंचालक रोहीत मोरे यांच्या हस्ते करण्यात आले.