वाईसीएममधील सिटी स्कॅन मशीन बंद

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात असलेल्या रुबी अल केअर येथील सिटी स्कॅन मशीन मागील एक ते दिड महिन्यापासून बंद आहे. परिणामी, रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ज्या रुग्णांना तातडीने सिटी स्कॅन करायचे आहे, त्यांना खासगी रुग्णालयात जावे लागते.

    पिंपरी:  पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात असलेल्या रुबी अल केअर येथील सिटी स्कॅन मशीन मागील एक ते दिड महिन्यापासून बंद आहे. परिणामी, रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ज्या रुग्णांना तातडीने सिटी स्कॅन करायचे आहे, त्यांना खासगी रुग्णालयात जावे लागते.

    वायसीएम रुग्णालयात रुबी अल केअरच्या माध्यमातून सिटी स्कॅन केले जाते. रुबी अल केअरला जागा, वीज आणि इतर सुविधा या महापालिकेने दिल्या आहेत. त्या बदल्यात महापालिका हद्दीतील रुग्णांना कमी पैशात वैद्यकीय सुविधा पुरवण्याचे काम रुबी एल केअरचे आहे. परंतु, तांत्रिक कारणांमुळे सिटी स्कॅन मशीन बंद असल्याचे सांगण्यात येत आहे. आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून ही यंत्रणा चालविली जात आहे. या बाबतचे कंत्राट संपले असल्याने पुन्हा नव्याने कंत्राट काढण्यात आल्याची माहिती आहे.

    वायसीएम हे महापालिकेचे शहरातील सर्वात मोठे रुग्णालय आहे. येथे सर्व सुविधा उपलब्ध असल्याने शहराबरोबरच बाहेरील रुग्ण देखील येथे उपचार घेण्यासाठी येत असतात. खासगी रुग्णालयाच्या तुलनेत येथे कमी पैशात सिटी स्कॅन होत असल्याने येथे मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. सद्यस्थिती मशीन बंद असल्याने रुग्णांना परत जावे लागत आहे. ज्यांना तातडीने सिटी स्कॅन करायचे आहे, त्याना नाइलाजाने खासगी रुग्णालयात जावे लागत आहे. तातडीने करायचे नसले तर मशीन सुरू झाल्यावर या असे सांगण्यात येत आहे.

    वायसीएम येथील रुबी एल केअर येथे सिटी स्कॅन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. दिवसाला सरासरी 30 ते 35 जणांचे सिटी स्कॅन केले जाते. ज्यांना तातडीने सिटी स्कॅन करायचे आहे, असे रुग्ण, त्याचबरोबर अपघात झालेले रुग्ण, वायसीएम रुग्णालयात दाखल असलेले रुग्ण अशा रुग्णांना समावेश असतो. या व्यतिरिक्त देखील रुग्ण येथे येत असतात. अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे म्हणाले, ”सद्यस्थितीत असलेल्या सिटी स्कॅन मशीनची ट्यूब गेली आहे. त्यामुळे सध्या मशीन बंद आहे. नवीन मशीन घेण्यात येणार आहे. त्याबाबतची प्रक्रिया सुरू झालेली आहे. नवीन तंत्रज्ञानाची उच्च दर्जाची मशीन घेण्यात येणार आहे”.