जेवणाच्या ताटातली चवच हरपली, थाळीतून टोमॅटो, कोथिंबीर गायब, फोडणीतून जिरे, आलंही बेपत्ता, जिऱ्याला मिळतोय सोन्याचा भाव!

    मुंबई – वाढत्या महागाईचा परिणाम थेट अन्नावर झाला आहे. गेल्या काही दिवसांत पाऊसच न पडल्यानं आणि प्रडंच उष्णतेमुळं भाज्यांचे भाव प्रचंड कडाडले आहेत. त्यामुळं रोजच्या अन्नाच्या थाळीतून चवीचे पदार्थ गायब झालेले आहेत. टॉमेटो () असो वा दैनंदिन जेवणाची स्वाद वाढवणारी आलं, कोथिंबीर असो. त्यांच्या किंमती कमी होताना दिसत नाहीयेत. महागाई इतकी कडाडली आहे की आधी जेवणातून टॉमेटो बाद झाले आता फोडणीत जिरं घालायचं की नाही, असा प्रश्न गृहिणींना पडलेला आहे. मसाल्यांचा राजा अशी ओळख असलेल्या जिऱ्याचे () भाव गगनाला भिडलेले आहेत. पालेभाज्या, टॉमेटो, कोथिंबीर, जिरं, आलं या सगळ्यांचेच भाव कडाडल्यानं स्वयंपाकाची मजाच दिवसेंदिवस हरवत चाललीय की काय, अशी स्थिती निर्माण झालीय.

    आधी टॉमेटे आता जिरं गायब

    जिऱ्याचे भाव रॉकेटच्या वतीनं वाढतायेत. घाऊक बाजारात जिरं ५७ ते ५८ हजार क्विंटलवर पोहचलंय. किरकोळ दुकानात जिऱ्याची किंमत ७०० ते ९०० रुपये किलोनं मिळतंय. जिऱ्याची तुलना काडू बदामशी केली तर त्यांच्यापेक्षाही जास्त दर जिऱ्यासाठी द्यावा लागतोय. बदाम घाऊक बाजारात ६५० ते ७०० रुपयांनी विकला जातोय, तर जिरं गेल्या आठवड्यात ७०० ते ९०० रुपयांपर्यंत पोहचलंय. दोन आठवड्यांपूर्वी जे जिरं १५० ते २०० रुपये किलोनं विकलं जात होतं आता त्याची किंमत ९०० रुपये झालीय. तुम्हीच विचार करा, की तुमच्या भाज्यांच्या फोडणीत यापुढं जिरं दिसेल का ते. जिऱ्यानं आत्तापर्यंतच्या भावाचा रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे.

    मसाले आणि भाजिपाला आवाक्याबाहेर

    ही स्थिती फक्त जिऱ्याची नाही. टॉमेटा १२० रुपये प्रतिकिलोनं बाजारात मिळतो आहे. काही दिवासंपूर्वी टॉमेटो ३० रुपये किलोनं चांगल्या प्रतीचा मिळत होता. नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत चांगली कोथिंबीरीची जुडी १५० रुपयांना विकली जातेय. तुमच्या हातात येईपर्यंत ती २५० पर्यंत जाण्याची शक्यता आहे. आलं प्रचंड महाग झालंय. ऐन पावसाळ्यात आल्याचा चहा आता स्वप्नवत होण्याची शक्यता आहे. आलं २५० रुपयांच्यावर जाऊन पोहचलंय. मेथी, पालक बाजारात दिसेना झालेत. मेथीची जुडी चांगली घेतली तर १०० रुपयांपर्यंत पोहचलेली आहे. भाज्यांच्या किंमतीत ही वाढ सुमारे ५० टक्क्यांहून जास्त असल्याचं सांगण्यात येतंय. अशा स्थितीत भाज्या दर दिवशी खायच्या की नाहीत, असाच प्रश्न सामान्य जनतेपुढं उभा राहिलाय. त्यामुळेच कडधान्य आणि चिकन-मटणची मागणी बाजारात वाढण्याची शक्यता निर्माण झालीय.