शिंदे गटाच्या विमानतळ नामकरण भूमिकेबाबत उत्सुकता

    नवी मुंबई (सिद्धेश प्रधान) : शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व नाकारत स्व. बाळासाहेब ठाकरे आणि स्व. आनंद दिघे यांचे हिंदुत्व (Hindutwa)   स्वीकारले आहे. शिंदे गटाला सोबत घेत सत्ता स्थापना करण्याची भाजप (BJP) वाट पाहत आहे. जर ही युती घडत नवे सरकार स्थापन झाल्यास अनेक बाबींची उत्तरे शिंदे गटाला द्यावी लागणार आहेत. आंतरराष्ट्रीय विमानतळाला बाळासाहेबांचे नाव देण्याला भूमिपुत्रांचा विरोध आहे. तर, विमानतळाला स्व. दी. बा पाटील (Late D.B. Patil) यांचे नाव द्यावे या भूमिकेला भाजपचा उघड पाठिंबा आहे.

    नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला (Navi Mumbai Airport) स्व. दि. बा पाटील यांचे नाव द्यावे अशी भूमिका विमानतळाची घोषणा झाल्यापासून ठाणे, नवी मुंबई, पनवेल उरणमधील भूमिपुत्रांनी घेतलेली आहे. अनेक पत्रं सिडकोला दिली आहेत. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशावरून सिडकोने (Cidco) संचालक बैठकीत विमानतळाला स्व. बाळासाहेब ठाकरे विमानतळ असे नाव देण्याचा ठराव करण्यात आला. या प्रस्तावाने भूमिपुत्रांमध्ये शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात आक्रोश निर्माण झाला आहे. शिवसेनेविरोधातील या आक्रोशाची संधी साधत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असलेले भूमिपुत्रांच्या मतांचे महत्व ओळखत भाजपने दि. बा. पाटलांच्या नावास पाठिंबा देत हे आंदोलनच हायजॅक केले. या आंदोलनाची धार पेटवती ठेवण्यात स्वारस्य असल्याचे जाणवून भाजपकडून सातत्याने भूमीपूत्रांना चेतवले आहे.

    विमानतळाला दि. बांचे नाव योग्य असल्याची भूमिका ही इतर समाजातील नागरिकदेखील मान्य करत आहेत. दी. बांच्या त्यागातून भूमिपुत्रांच्या पिढ्या सुखाचे दिवस पाहत आहेत. त्यामुळे त्यांची भावना ही शासनानेदेखील लक्षात घेणे गरजेचे आहे. असे असताना शिवसेनेचा बाळासाहेबांच्या नावाला हट्ट घातकी ठरण्याची शक्यता आहे. हिच संधी भाजपने साधत दि. बांच्या नावास पाठिंबा दिला आहे. त्यासाठी खुद्द एकनाथ शिंदे यांनीदेखील भूमीपुत्रांचा रोष पत्करला आहे. सध्या राजकीय बंडाद्वारे एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना एकप्रकारे विरोध दर्शवत स्व. बाळासाहेब ठाकरे आणि स्व. आनंद दिघे यांचे हिंदुत्व स्वीकारले आहे. बाळासाहेबांचे नाव घेत या गटाने मतदार दुरावू नये याची काळजी घेतली. यातील शिवसेना आणि बाळासाहेब यापैकी एकही नाव गाळून शिंदे गटाला पुढील राजकारण करणे कठीण जाणार आहे. त्यामुळे ही दोन्ही नावे शिंदे गटासाठी राजकारणाची ‘संजीवनी’ आहे.

    गेले तीन दिवस शांत असलेल्या शिवसैनिकांकडून शिंदे गटाला विरोध सुरु करण्यात आला आहे. शिंदे गटापुढे अनेक संकटे उभी ठाकणार आहेत. यामध्ये आगरी-कोळी समाजाच्या भावना दडलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरणाचा मुद्दा आहे. भाजपचे सरकार अस्तित्वात येताच नामकरण मुद्दादेखील जोर धरण्याची शक्यता आहे. हा मुद्दा उपस्थित झाल्यास राजकीय भवितव्य टिकवण्यासाठी बाळासाहेबांच्या नावाचा वापर करणारा शिंदे गट काय भूमिका घेणार? दि. बांच्या नावाला सहमती दर्शविणार का? हा प्रश्न आहे. तसे झाल्यास शिंदे गटासोबत जोडलेल्या शिवसैनिकांचा रोष ओढवून घ्यावा लागणार आहे.