आताच्या सरकारला शेतकऱ्यांसोबत चर्चाच करायची नाही ही भूमिका – अजित पवार

ऑक्टोबरमध्ये जो परतीचा पाऊस झाला त्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. त्यातून शेतकऱ्यांना जी मदत मिळायला हवी होती तशी मदत मिळताना दिसत नाही. एकतर पीकविम्याचे पैसे इतके तुटपुंजे मिळत आहेत की, शेतकऱ्यांना जी पीक विम्याची रक्कम जो विमा उतरवला आहे, तो जवळपास दीड ते दोन हजार रुपयांचा आहे आणि त्यांच्या खात्यात फक्त ७०-९० रुपये आले आहेत.

    मुंबई – या सरकारबद्दल शेतकर्‍यांच्या मनात फार मोठी नाराजी आहे. या सरकारने जलसमाधी घेण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊ देता कामा नये. आम्ही सरकारमध्ये असताना आंदोलनाची भूमिका कुणी मांडली तर त्यांच्याशी चर्चा करत होतो, मात्र आताच्या सरकारला शेतकऱ्यांसोबत चर्चाच करायची नाही. ही भूमिका लोकशाहीमध्ये, सरकारमध्ये ठेवणे हे अतिशय चुकीचे आहे. त्यामुळे सरकारने त्यांना वेळ दिला पाहिजे असे रोखठोक मत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधानभवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत मांडले.

    ऑक्टोबरमध्ये जो परतीचा पाऊस झाला त्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. त्यातून शेतकऱ्यांना जी मदत मिळायला हवी होती तशी मदत मिळताना दिसत नाही. एकतर पीकविम्याचे पैसे इतके तुटपुंजे मिळत आहेत की, शेतकऱ्यांना जी पीक विम्याची रक्कम जो विमा उतरवला आहे, तो जवळपास दीड ते दोन हजार रुपयांचा आहे आणि त्यांच्या खात्यात फक्त ७०-९० रुपये आले आहेत. यासंदर्भात केंद्र सरकारची मदत घेऊन या विमा कंपन्यांना ऐकायला भाग पाडण्यासाठी गरजेचे आहे.

    यासंदर्भात काही शेतकरी कोर्टात गेले आहेत. शेतकऱ्यांचा पीक विमा राज्य सरकार काढत असते त्याला काही प्रमाणात केंद्र सरकारची मदत होत असते. त्यावेळी शेतकऱ्यांना स्वतःच्या पीक विम्याच्या पैशासाठी कोर्टात जाण्याची वेळ सरकारने येऊ देऊ नये. सरकारने त्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे. आणि वेळ पडली तर केंद्र सरकारला हस्तक्षेप करायला सांगितले पाहिजे. त्यातून शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे अशी मागणीही अजित पवार यांनी केली.

    शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी होत नाहीयत. तुपकर यांनी मला सरकारकडे वेगवेगळ्या मागण्या केल्याचे सांगितले. त्यांची एवढीच इच्छा आहे की, या मागण्यांसंदर्भात भूमिका घेतली आहे तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी वेळ द्यावा व बैठक आयोजित करावी अशी मागणी आहे. यासंदर्भात आजच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पत्र देणार आहे असेही अजित पवार म्हणाले.