विद्यमान खासदार हेमंत गोडसेंना उमेदवारी अद्याप नाहीच; दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांच्या दोन भेटी…

नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी शिंदे गटाकडून इच्छुक असलेले विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी गेल्या दोन दिवसांत दोन वेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊनही त्यांना पक्षाने 'वेटींग'वरच ठेवले आहे.

  नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी शिंदे गटाकडून इच्छुक असलेले विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी गेल्या दोन दिवसांत दोन वेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊनही त्यांना पक्षाने ‘वेटींग’वरच ठेवले आहे. नाशिकच्या जागेवर दोन वेळा शिवसेनेचा खासदार निवडून आल्याने तिसऱ्यांदा पुन्हा शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांची दावेदारी प्रबळ मानली जात आहे.

  खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाशकात येऊन गोडसे यांच्या उमेदवारीची घोषणा केली. परंतु त्यानंतर राजकारणातील फासे पलटले. त्यामुळेच गोडसेंना अद्यापही उमेदवारी मिळालेली नाही.

  गोडसे बंडखोरी करणार?

  हेमंत गोडसे यांना पक्षाकडून उमेदवारी मिळत नसल्याने त्यांनी अपक्ष उभे राहावे यासाठी पक्षाचे कार्यकर्ते व समर्थकांकडून दबाव टाकला जात असून, खुद्द गोडसे हे देखील त्या मन:स्थितीत असल्याचे सांगितले जाते. दोन दिवसांपूर्वी गोडसे यांच्या काही समर्थकांनी पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेत गोडसे यांना सामावून घ्यावे यासाठी प्रयत्न केले. परंतु, ‘मातोश्री’वरून स्पष्ट शब्दात नकार देण्यात आल्याने गोडसे यांच्यासाठी सर्वपक्षीय दरवाजे बंद करण्यात आल्याने गोडसे यांच्या समोर बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी शिवाय पर्याय नसल्याचे सांगितले जात आहे.

  मुंबईत जोरदार शक्तिप्रदर्शन

  नाशिकच्या जागेवर भारतीय जनता पार्टी तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटानेही दावा सांगितल्यामुळे गोडसे यांच्यासह पालकमंत्री दादा भुसे, आमदार सुहास कांदे, जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते, महानगर प्रमुख बंटी तिदमे आदी पदाधिकाऱ्यांनी तब्बल दोन वेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समक्ष मुंबईत शक्तिप्रदर्शन केले.