सध्या ऑक्सिजनची मागणी ४०० मेट्रिक टन; ७०० टनावर गेली तर लॉकडाऊन लावण्याबाबत निर्णय : आरोग्यमंत्री राजेश टोपे

कोरोना रुग्णांची संख्या घटत आहे, असे समजू नये, असा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नागरीकांना दिला आहे. राज्यातील कोरोना परिस्थितीचा राज्य मंत्रिमंडळात आढावा घेण्यात आल्यानंतर माहिती देताना आरोग्यमंत्री मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

  मुंबई : राज्याला आज ऑक्सिजनची मागणी ४०० मेट्रिक टन इतकी आहे. यापैकी २५० नॉन कोविड आणि १५० मेट्रिक टन कोविड रुग्णांसाठी लागत आहे. ऑक्सिजनची मागणी ७०० टनावर गेली, तर लॉकडाऊन लावण्याबाबत निर्णय झाला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपें यांनी दिली आहे.

  कोरोना रुग्णांची संख्या घटत आहे, असे समजू नये, असा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नागरीकांना दिला आहे. राज्यातील कोरोना परिस्थितीचा राज्य मंत्रिमंडळात आढावा घेण्यात आल्यानंतर माहिती देताना आरोग्यमंत्री मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

  आलेख खाली जातोय या भ्रमात राहू नये

  टोपे म्हणाले की, दोन दिवस केसेस कमी आले म्हणून आलेख खाली जातोय या भ्रमात राहू नये. आजही ४६ हजार रुग्ण आढळले आहेत. पॉझिटिव्हीटी रेट राज्याचा २१.४ टक्के आणि मुंबईचा २७ टक्क्याच्या पुढे आहे. कोरोनाचे २ लाख २५ हजाराच्या घरात सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली.  ते म्हणाले की, कोरोना रुग्णसंख्या वाढत असली तरी ८६ टक्के लोक घरी किंवा कोविड सेंटरमध्ये विलगीकरणात आहेत. उर्वरित १४ टक्क्यात आयसीयूमध्ये १ टक्क्यांपेक्षा कमी रुग्ण आहेत. ऑक्जिजन बेडवर १.८९ टक्के आहेत. तर २.८ टक्के गंभीर रुग्ण आहेत.

  राज्याचा मृत्यूदर घटला

  राज्याचा मृत्यूदर डिसेंबरमध्ये .५० टक्के इतका होता. तो आता जानेवारीत ०.३० टक्के इतका आहे. तसेच दररोज २ लाख आरटीपीसीआर टेस्ट करण्याची क्षमता आहे. तसेच रॅपिड एन्टीजन टेस्ट करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, असेही टोपे म्हणाले. ते म्हणाले की, लोक घरी टेस्ट करतात त्यांचा डेटा मिळवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लक्षणे नसलेल्यांना घरी विलीगीकरणात ठेवण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. घरच्या घरी कोरोना टेस्ट करणाऱ्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास त्यांनी जवळच्या केंद्राला कळवावे, असे आवाहनही त्यांनी केले.

  लसीकरण दर कमी होताना दिसत आहे

  राज्यातील लसीकरणावरुन टोपे यांनी प्रतिक्रिया दिली. लसीकरण दर कमी होताना दिसत आहे. दररोज ६ लाख ५० हजार लोकांचे लसीकरण होत आहे. तर कमाल ८ लाख लोकांना लस मिळतेय. लसीकरणाला वेग दिल्या आहेत”, असे आरोग्यमंत्री म्हणाले. राज्यात आतापर्यंत ६७ टक्के लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. तर ९० टक्के लोकांनी एक डोस पूर्ण केला आहे. ३ जानेवारीपासून १५ ते १८ वर्षाखालील वयोगटातील ३५ टक्के मुलाचे लसीकरण झाले आहे. मात्र कोव्हॅकिसन अणि कोविशिल्ड लस कमी पडतेय त्याबाबत मुख्यमंत्रीकडून मागणी केली जाणार आहे. कोव्हॅकसिन लहान मुलांना दिली जात असून, त्याची मागणी जास्त आहे. आपल्याला कोव्हॅकसिनच्या ६० लाख आणि कोविशिल्डच्या ४० लाख लसींची गरज असल्याचेही टोपे यांनी सांगितले.