थकबाकीदारांचे नळ कनेक्शन तोडले; हातकणंगलेत नगरपंचायतीची कर वसुलीसाठी धडक माेहीम

घरफाळा व पाणीपट्टी पोटी सुमारे अडिच कोटी थकीत करवसूलीसाठी हातकणंगले नगरपंचायतीने धडक वसूली मोहीम सुरू केली असून, बुधवारी दिवसभरात सुमारे १२ पाणी कनेक्शन तोडण्यात आले आहेत. या कारवाईने नागरिकांत धडकी भरली आहे.

  हातकणंगले : घरफाळा व पाणीपट्टी पोटी सुमारे अडिच कोटी थकीत करवसूलीसाठी हातकणंगले नगरपंचायतीने धडक वसूली मोहीम सुरू केली असून, बुधवारी दिवसभरात सुमारे १२ पाणी कनेक्शन तोडण्यात आले आहेत. या कारवाईने नागरिकांत धडकी भरली आहे.

  हातकणंगले नगरपंचायतीकडे सुमारे ६५ लाख पाणीपट्टी व पावणे दोन कोटी रुपये घरफाळा थकीत आहे. त्यामुळे मार्च महिन्याच्या पार्श्वभुमीवर नगरपंचायतीच्या वसुलीला गती आली आहे. आतापर्यंत सुमारे २० टक्के पाणीपुरवठा व ४२ टक्के घरफाळा वसूली झाली आहे तर उर्वरीत येणे बाकी आहे. त्यामुळे पालिकेचे मुख्याधिकारी विशाल पाटील यांनी सहकाऱ्यासह वसुलीसाठी नियोजन केले आहे.

  शहरात वसुलीसाठी विविध पथके तयार करण्यात आली असून प्रत्येक पथकांत २ ते ३ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. नियुक्ती केलेल्या पथकांकडून आता घरोघरी फिरून वसुली केली जात आहे. शासनाने राज्यातील प्रत्येक पालिकेला कर वसुलीचे उद्दीष्ट दिले आहे.

  शिवाय लवकरच आचारसंहिता लागणार असल्याने वसुली मोहिम गतीमान करून तातडीने वसुली करून घेण्याचे आदेश दिले आहेत. ज्या पालिकेची वसुली टक्केवारी कमी होईल अशा पालिकेच्या मुख्याधिकारी, अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. पालिकेला मिळणारे पंधराव्या वित्त आयोगाचे अनुदान मिळणार नाही. त्यामुळे पालिकांना वसुलीसाठी जोर लावावा लागणार आहे.

  शंभर टक्के कर वसुलीचे उद्दिष्ट

  शंभर टक्के कर वसुलीचे उद्दिष्ट ठेवून नगरपंचायत प्रशासनाने मोहीम गतिमान केली आहे. प्रसंगी कठोर कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत. आधी विनंतीवजा आवाहन केल्यानंतर प्रत्यक्ष कारवाई असे वसुलीचे नियोजन प्रशासनाने केले आहे. कर न भरणाऱ्या नागरिकांचा पाणी पुरवठा तोडला जात आहे.

  थकीत करवसूलीसाठी शासनांकडून आदेश आले आहेत. थकबाकीदारांना सुरुवातीला विनंती केली आहे. तरीही न जुमानणाऱ्या मोठ्या थकबाकीदारावर नाईलास्तव कारवाई करणे भाग आहे. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे.

  - आसावरी सुतार, पाणीपुरवठा अभियंता