थेट पोलिस निरीक्षकालाच गंडा, 4.49 लाखांची ‘अशी’ झाली फसवणूक

मुंबई पोलिस दलातील (Mumbai Police Force) अधिकाऱ्याचीच ऑनलाईन सायबर फसवणूक झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. या अधिकाऱ्याची 4.49 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. पोलिस निरीक्षक पदावर असलेले अधिकारी मलबार पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत.

    मुंबई : मुंबई पोलिस दलातील (Mumbai Police Force) अधिकाऱ्याचीच ऑनलाईन सायबर फसवणूक झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. या अधिकाऱ्याची 4.49 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. पोलिस निरीक्षक पदावर असलेले अधिकारी मलबार पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत.

    या पोलिस अधिकाऱ्यास 11 नोव्हेंबरला डेबिट कार्ड मिळाले होते. त्यानंतर त्यांना अनोळखी क्रमांकावरून फोन आला. तुमच्या बँकेतून बोलत असून, कार्डचा पिन सेटअप करून देण्यासाठी फोन केला आहे, असे सांगत त्याने एक फाईल पाठवली. त्या फाईलवर क्लिक केल्यावर फोन करणाऱ्या व्यक्तीने त्यांना सर्व वैयक्तिक माहिती भरण्यास सांगितली. त्यानंतर पॅनकार्ड क्रमांक, डेबिट कार्ड क्रमांक व कार्ड संपण्याची तारीख टाकायला सांगितले.

    या पोलिस अधिकाऱ्याच्या मोबाईलवर अनेक मेसेज आले. त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर फोन करणाऱ्या व्यक्तीने त्यांच्या दुसऱ्या खात्याची माहिती मागितली. तेव्हा अधिकाऱ्याला संशय आला. बँक खात्याची माहिती काय करायची आहे, असा प्रश्न अधिकाऱ्याने केला असता त्याने कॉल बंद केला. तोवर खात्यातून पैसे गेल्याचे निष्पन्न झाले.