डी. वाय. पाटील कारखाना पहिली उचल ३००० रुपये देणार : आमदार सतेज पाटील

कारखान्याने खर्चात काटकसरीचे धोरण नेहमीच अवलंबले असून त्यातून शेतकऱ्यांना एफ. आर. पी. पेक्षा जादा दर देण्याची भूमिका कायम ठेवली आहे. चालू हंगामात गाळपास येणाऱ्या ऊसास पहिली उचल प्रति मे. टन ३००० रुपये दिली जाणार आहे. असं आ. सतेज पाटील म्हणाले.

    गगनबावडा : निर्यात साखर विक्रीची कोटा पध्दत रद्द करुन खुल्या पद्धतीने (OGL) साखर निर्यातीस परवानगी मिळावी. केंद्राने साखरेचा ‍किमान हमीभाव ३५ रुपये करावा. साखर कारखान्यांनी साखरेचे उत्पादन कमी करुन इथेनॉल निर्मितीकडे वळावे असे मत माजी सहकारमंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केले. पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्याच्या २० व्या गळीत हंगाम शुभारंभप्रसंगी अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते.

    कारखान्याचे अध्यक्ष आ. सतेज पाटील म्हणाले, महागाईबरोबर रासायनिक खते, औषधे यांचे दर वाढत आहेत. परिणामी साखरेचा हमीभाव वाढविणे गरजेचे आहे. यातून शेतकऱ्यांच्या ऊसास जादा दर देता येईल. कारखान्याने खर्चात काटकसरीचे धोरण नेहमीच अवलंबले असून त्यातून शेतकऱ्यांना एफ. आर. पी. पेक्षा जादा दर देण्याची भूमिका कायम ठेवली आहे. चालू हंगामात गाळपास येणाऱ्या ऊसास पहिली उचल प्रति मे. टन ३००० रुपये दिली जाणार आहे. शासनाने गोपीनाथ मुंडे ऊस तोडणी वाहतूक महामंडळास कारखान्याकडून वर्गणी घेण्याचे धोरण ठरविले आहे. मात्र ऊस तोडणी वाहतुक यंत्रणेकडून होणाऱ्या फसवणुकीबाबत सदर महामंडळाकडून उपाययोजना होण्याची गरज आहे.

    खासदार संजय मंडलिक म्हणाले, तालुक्याची भौगोलिक परिस्थिती विषम असताना, कारखानदारीपुढे असंख्य अडचणी असताना देखील आ. सतेज पाटील यांनी गेल्या २० वर्षात डी. वाय. पाटील कारखाना चांगल्या पध्दतीने चालविला आहे. कारखान्यांनी फक्त साखर विकून चालणार नाही तर उपपदार्थांची निर्मिती केल्यास कारखानदारी चांगले दिवस येतील.

    सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी म्हणाले, कै. शिवरामभाऊ जाधव यांनी या कारखान्यावर ठेवलेला विश्वास कारखान्याने सार्थ करुन दाखविला आहे. कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे हित जोपासण्याचे काम या कारखान्याने केले. कारखान्यामुळे सिंधुदुर्गात मोठ्या प्रमाणात ऊस लागवड झाली. या कारखान्यास कर्जपुरवठ्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची नेहमीच सहकार्याची भावना राहील.

    आ. बाळासाहेब पाटील, आ. सतेज पाटील, खा. संजय मंडलिक, बॅक अध्यक्ष मनिष दळवी, डॉ. संजय डी. पाटील, गोकुळ अध्यक्ष विश्वास पाटील व इतर उपस्थित मान्यवरांच्या हस्‍ते गव्‍हाणीत ऊसाची मोळी टाकून २० व्‍या गळीत हंगामाचा शुभारंभ करण्‍यात आला. मान्‍यवरांच्‍या हस्‍ते काटापूजन करण्‍यात आले. सिंधुदुर्ग जिल्हा बँक, कोल्हापूर जिल्हा बँक व गोकूळ दूध संघाचे संचालक व इतर उपस्थित मान्‍यवरांचा सत्‍कार कारखाना संचालकांच्‍या हस्‍ते करण्‍यात आला. गत हंगामात कारखान्याकडे सर्वाधिक ऊस तोडणी वाहतुक केलेल्या कंत्राटदारांचा सत्कार करण्यात आला.

    कार्यक्रमास कारखान्याचे व्हा. चेअरमन बंडोपंत कोटकर, संचालक डॉ. संजय पाटील, मानसिंग पाटील, खंडेराव घाटगे, जयसिंग ठाणेकर, दत्तात्रय पाटणकर, गुलाबराव चव्हाण, चंद्रकांत खानविलकर, बजरंग पाटील, प्रभाकर तावडे, रविंद्र पाटील, संजय पडवळ, महादेव पडवळ, धैर्यशील घाटगे, अभय बोभाटे, रामचंद्र पाटील, तानाजी लांडगे, उदय देसाई, वैजयंती पाटील, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक, कोल्हापूर जिल्हा बँक संचालक, गोकुळ दूध संघाचे संचालक, कारखान्याचे कार्यकारी संचालक जयदिप पाटील, सेक्रेटरी नंदू पाटील यांच्‍यासह सभासद, शेतकरी, खातेप्रमुख, बँक स्‍थायी अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.

    दिवाळी गोड

    चालू वर्षी दिवाळीपूर्वी ५० रुपयांचा अंतिम हप्ता देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड केली आहे. ही परंपरा यापुढेही चालू ठेवण्याचे कारखान्याचे धोरण ठरले असून शेतकऱ्यांची पुढची दिवाळी गोड केली जाणार असल्याचे आ. सतेज पाटील यांनी सांगीतले.