कुख्यात गुंडांचे मुख्यमंत्र्यांबरोबर फोटो व मंत्रालयात रिल्स, यावर दादा भुसे यांची पहिली प्रतिक्रिया

त्र्यंबकेश्वरमध्ये निवृत्तीनाथ महाराजांची यात्रेतील वारकऱ्यांची सोय आणि व्यवस्था याची पाहणी करण्यासाठी आलेल्या सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गुंडांसोबतच्या फोटोवरुन होणाऱ्या टीकेवर प्रत्युत्तर दिले.

    नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)यांचे पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ (Nilesh Ghaywal) यांच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर (Nilesh Ghaywal With Eknath Shinde) व्हायरल झाले. तसेच मंत्रालयामध्ये गुंडांनी रिल्स (  gangsters Reels in Mantralaya)देखील काढल्यामुळे विरोधकांनी मुख्यमंत्री शिंदेंवर टीकास्त्र सोडले होते. विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्र्यांसोबत असणाऱ्या फोटोवरुन सवाल उपस्थित केले. यावर आता सरकारमधील मंत्र्यांनी राज्य सरकारकडून प्रतिक्रिया दिली आहे.

    त्र्यंबकेश्वरमध्ये निवृत्तीनाथ महाराजांची यात्रेतील वारकऱ्यांची सोय आणि व्यवस्था याची पाहणी करण्यासाठी आलेल्या सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गुंडांसोबतच्या फोटोवरुन होणाऱ्या टीकेवर प्रत्युत्तर दिले. दादा भुसे म्हणाले, आम्ही गुंड प्रवृत्तीच्या लोकांचे समर्थन करत नाही. गर्दीत कोणी आला असेल, मुख्यमंत्री सतत गर्दीत असतात. याआधी वर्षा बंगल्यावर विशिष्ट लोकांना सोडण्यात येत होतं. आता सर्वसामान्य नागरिकही वर्षावर जात आहेत. इतक्या किरकोळ गोष्टीचा बाऊ करणं योग्य नाही. जे आरोप करत आहेत त्यांचेही फोटो आम्ही दाखवू शकतो. असा घणाघात दादा भुसे यांनी केला.

    दादा भुसेंचा संजय राऊतांना टोला

    संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर फोटोंवरुन टीकेची झोड उठवली आहे. यानंतर आता दादा भुसे यांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिले. मंत्री भुसे म्हणाले, संजय राऊतांकडे हल्ली कोणी गांभीर्याने पाहत नाही. राऊत सातत्याने गणपत गायकवाडांचा उल्लेख करून मुख्यमंत्र्यांवर टीका करत आहेत. त्यामुळे राऊत स्वतः गणपत गायकवाड यांच्याकडे हिशोब घेण्यासाठी गेले होते का? असा सवाल करत दादा भुसेंनी संजय राऊतांचा खरपूस समाचार घेतला आहे.