दादा, तुम्हीच राजीनामा देण्याचे बोलला होतात; डाॅ. अमाेल काेल्हे यांची कोपरखळी

दादा तुम्हीच राजीनामा देताे आणि शेती करतो, असे बाेलले हाेते, त्यावर तुम्हीच प्रतिक्रीया द्या, अशी काेपरखळी महाविकास आघाडीचे शिरुर मतदारसंघातील उमेदवार डाॅ. अमाेल काेल्हे यांनी मारली.

  पुणे : दादा तुम्हीच राजीनामा देताे आणि शेती करतो, असे बाेलले हाेते, त्यावर तुम्हीच प्रतिक्रीया द्या, अशी काेपरखळी महाविकास आघाडीचे शिरुर मतदारसंघातील उमेदवार डाॅ. अमाेल काेल्हे यांनी मारली. शिरूर लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार डाॅ. कोल्हे यांच्या प्रचारार्थ पुण्यातील कोंढवा येथे बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
  डाॅ. काेल्हे हे माझ्याकडे खासदारकीचा राजीनामा देणार हाेते, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार हे सातत्याने सांगत आहेत. तसेच त्यांच्यावर जोरदार टीका करीत आहेत. त्यास काेल्हे यांनी उत्तर दिले आहे. ते म्हणाले ‘राजीनाम्याची गोष्ट मी कधीही जाहीरपणे व्यक्त केली नव्हती. संसदेत काम करत असून तीन वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे. ते  संसदेत सक्रिय असल्याचे लक्षण आहे.
  दादा तुम्हीच राजीनामा देतो आणि शेती करतो असे बाेलले हाेते. त्यावर तुम्हीच आता भूमिका मांडावी.’
  महायुतीचे उमेदवार आढळराव यांनी केलेल्या टिकेवर काेल्हे यांनी उत्तर दिले आहे. ते म्हणाले, ‘त्यांनी संसदेत जे प्रश्न विचारले आहेत ते एकदा दादांनी पहावे. पाणबुडी आणि शिरूर लोकसभा मतदार संघाचा काय संबंध ? रेल्वे मधील वाय-फाय आणि शिरूरचा काय संबंध ? याचा विचार करून दादांनीच उत्तर द्यावे.’
  ‘याचाच अर्थ माझे काम बोलत आहे’
  अजित पवार कालपासून शिरूर लोकसभेत सक्रिय झाले असून, सभा तसेच बैठका घेत आहेत. यावर कोल्हे यांना विचारले असता ते म्हणाले की, दादांच्या कथनी आणि करणीमध्ये फरक आहे. दादां सारख्या एका राष्ट्रीय पक्षाच्या नेत्याला शिरूर लोकसभा मतदारसंघात तळ ठोकून बसावे लागत आहे. याचाच अर्थ माझे काम बोलत आहे, असेही यावेळी कोल्हे म्हणाले.