दलित पँथर शिंदे गटासोबत जाईल असं वाटत नाही – सुषमा अंधारे

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी शिंदे गटावर टिका करताना, दलित पँथर शिंदे गटासोबत जाईल असं वाटत नाही, असं म्हटलं आहे. तसेच आगामी काळात शिंदे गटातील नाराज आमदार एक-एक ठाकरे गटात सामील होतील, असं देखील अंधारे यांनी म्हटलं आहे.

    मुंबई – ठाकरे-आंबेडकर (Thackeray Ambedkar) युतीला शह देण्यासाठीच शिंदे गटाकडून (Shinde Group) नवीन खेळी खेळण्यात येत आहे. दलित पँथर (dalit panther) आणि शिंदे गट युती करणार असल्याचं बोललं जात आहे. तसेच 25 नोव्हेंबरला कराडमध्ये दलित पँथरच्या राज्य कार्यकारिणीची बैठक होणार आहे. या बैठकीत शिंदे गटासोबत युती करण्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. मात्र यावर ठाकरे गटाकडून प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी शिंदे गटावर टिका करताना, दलित पँथर शिंदे गटासोबत जाईल असं वाटत नाही, असं म्हटलं आहे. तसेच आगामी काळात शिंदे गटातील नाराज आमदार एक-एक ठाकरे गटात सामील होतील, असं देखील अंधारे यांनी म्हटलं आहे.

    ठाकरे गट व वंचित बहुजन आघाडी आगामी पालिका निवडणुकीत एकत्र येणार असल्याचं बोललं जात आहे. ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे रविवारी एकाच मंचावर आले होते. यावेळी दोन्ही नेत्यांनी एकत्र येण्याचे संकेतही दिलेत. त्यामुळे शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र येत निवडणूक लढवणार आहे, असं चित्र आहे. याला दोन्हीकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. शिवशक्ती-भीमशक्तीला टक्कर देण्यासाठी शिंदे गट व दलित पँथर एकत्र येणार असल्याचं देखील अंधारेंनी म्हटलं आहे. माध्यमांशी संवाद साधताना सुषमा अंधारे यांनी शिंदे गटावर टिका केली.