दापोली साई रिसॉर्ट प्रकरण : सरकारी अधिकाऱ्यांवर कारवाई करा, किरीट सोमय्या यांची अवमान याचिकेमार्फत मागणी

सरकारी अधिकाऱ्यांनी याचिकाकर्त्यांना मदत करण्याच्या हेतूने न्यायालयाची दिशाभूल करणारे प्रतिज्ञापत्र दाखल केल्याचा आरोप सोमय्या यांनी अवमान याचिकेतून केला असून न्यायालयाची दिशाभूल करणारे प्रतिज्ञापत्र सादर करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांवर अवमान कारवाईची मागणी केली आहे.

  • दिशाभूल करणारे प्रतिज्ञापत्र सादर केल्याचा याचिकेत दावा

मुंबई : दापोलीतील (Dapoli) साई रिसॉर्टच्या (Sai Resort) बांधकामावर (Construction) पाडकाम कारवाई (Demolition Action) केली नसल्याचा रत्नागिरी उपविभागीय अधिकाऱ्यांनी प्रतिज्ञापत्रामार्फत केलेला दावा न्यायालयाची दिशाभूल करणारा आहे. रिसॉर्टची स्थिती ‘जैसे थे’ ठेवण्याचे आदेश कनिष्ठ न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे या अधिकाऱ्यांवर अवमान कारवाई करावी, अशी मागणी करणारी अवमान याचिका भाजप नेते किरीट सोमय्या (Contempt Petition BJP Leader Kirit Somaiya) यांनी उच्च न्यायालयात (High Court) केली आहे.

दापोलीतील साई रिसॉर्टच्या बांधकामावर पाडण्याच्या आदेशाविरोधात सदानंद कदम (Sadananda Kadam) यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून कारवाईला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. रिसॉर्टविरोधात कठोर कारवाई करण्याआधी कदम यांना पूर्वसूचना देण्याचे आदेश न्यायालयाने केंद्रीय मंत्रालयाला दिले होते. त्यातच दिवाणी न्यायालयाने रिसॉर्टच्या बांधकाम ‘जैसे थे’ ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाला कनिष्ठ न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. मात्र, न्यायालयाच्या ‘जैसे थे’ आदेशामुळे रिसॉर्टवरील पाडकाम कारवाई केली नसल्याचा दावा उपविभागीय अधिकाऱ्यांनी प्रतित्रापत्रातून केला आहे.

मात्र, सरकारी अधिकाऱ्यांनी याचिकाकर्त्यांना मदत करण्याच्या हेतूने न्यायालयाची दिशाभूल करणारे प्रतिज्ञापत्र दाखल केल्याचा आरोप सोमय्या यांनी अवमान याचिकेतून केला असून न्यायालयाची दिशाभूल करणारे प्रतिज्ञापत्र सादर करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांवर अवमान कारवाईची मागणी केली आहे.

या रिसॉर्टच्या अन्य जागेवरही किनारपट्टी क्षेत्र नियमावलीचे उल्लंघन करून अतिक्रमण केले आहे. याबाबत स्थानिक पातळीवरील सरकारी अधिकाऱ्यांना तक्रार करूनही कोणतिही कारवाई करण्यात आली नसून दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून अनेक तथ्य लपवण्यात आल्याचा दावाही सोमय्या यांनी याचिकेत केला आहे.