Speaking on this occasion, Darekar
Speaking on this occasion, Darekar

  मुंबई : कंत्राटी नोकर भरतीवरून जनसामान्यांची, बेरोजगार तरुणांची उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसच्या नेत्यांनी दिशाभूल केली आहे. यांचे हे पाप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उघडं केले असून उद्धव ठाकरे, शरद पवारांनी महाराष्ट्रातील जनतेची नाक घासून माफी मागावी, असा घणाघाती हल्लाबोल भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी आज मुंबई भाजपा दक्षिण जिल्ह्याच्या वतीने जिल्हा कार्यालय, गिरगांव येथे आयोजित केलेल्या जन आक्रोश आंदोलनावेळी केला.

  यावेळी मुंबई भाजपा सरचिटणीस संजय उपाध्याय, जिल्हा अध्यक्ष शरद चिंतनकर, माजी नगरसेवक अतुल शहा व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. या आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी माफी मांगो, महाविकास आघाडीचा धिक्कार असो, असे फलक हाती घेतले होते. या फलकाची कार्यकर्त्यांनी होळीही केली.

  यावेळी बोलताना दरेकर म्हणाले की, एकही मारा लेकिन जोर से मारा. देवेंद्र फडणवीस यांची ही एक पद्धत आहे. अगोदर आम्ही भुंकायला देतो आणि याचा अतिरेक होतो त्यावेळी कागद पत्रासहित सत्यता लोकांसमोर आणण्याचे काम अनेकदा भाजपा आणि आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. लोकांच्या मनात सरकारच्या, भाजपच्या विरोधात आणि खासकरून देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेवर डाग लावण्याचा प्रयत्न सुरू होता. म्हणून काल देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेऊन अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आणि उद्धव ठाकरे यांच्या कारकिर्दीत निघालेले जीआर, झालेले निर्णय जनतेसमोर कागदपत्रासहित दाखवून त्यांचे पाप उघड केले. त्यामुळे महाविकास आघाडी आता तोंडावर आपटली आहे.

  दरेकर पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना पाप केले, ज्यांचा आशीर्वाद होता त्या शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली पाप केले. महाविकास आघाडीचे सरकार असताना निर्णय घेतले म्हणून या सगळ्या पापाचे धनी महाविकास आघाडी, शरद पवार, उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते आहेत. महाराष्ट्रातील युवकांना भडकविण्याचे काम, त्यांना चुकीचे मार्गदर्शन करण्याचे काम करत होते ते पितळ उघड झाले आहे. नाक घासा आणि महाराष्ट्रातील जनतेची माफी मागा यासाठी हे उग्र आंदोलन छेडले आहे.

  दरेकर पुढे म्हणाले की, आमच्यात काय व्हावे यापेक्षा तुमची काळजी करा. तुम्ही आता बॉर्डरवर आहात. उद्धव ठाकरे यांचा पक्ष एकनाथ शिंदे यांच्याकडे पूर्णपणे आला, ते भाजपासोबत आले. अजित पवार राष्ट्रवादी घेऊन भाजपासोबत आले. आता अब की बार काँग्रेस की बारी आने वाली है. त्यामुळे वडेट्टीवार यांनी सावध राहावे.

  रोहित पवार यांचा जीव केवढा, देवेंद्र फडणवीस यांचे व्यक्तिमत्व काय. त्यामुळे त्यांनी औकातीत बोललेले बरे आहे. देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा काय आहे हे महाराष्ट्रातील जनतेला भाजपा नेता म्हणून माहित आहे. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून पाच वर्ष पाहिले आहे. आता तीन पक्षाचे सरकार चालवताना ते खरे की खोटे हे जनतेला माहित आहे. ज्यांच्या घराण्याने आयुष्यभर खोट्याचे राजकारण केले त्यांनी सत्यता सांगण्याची गरज नाही, असा टोलाही दरेकर यांनी यावेळी लगावला.

  आदित्य ठाकरेंची ‘दिशा’ भरकटलेली

  आदित्य ठाकरे यांची ‘दिशा’च भरकटलेली आहे. दिशा सालियन प्रकरणात काय दिशा यायची ती येईल. त्यामुळे आदित्य ठाकरे भरकटलेले आहेत. त्यांना दिशा सापडणार नाही हे नक्की आहे, असा टोलाही दरेकर यांनी आदित्य ठाकरे यांना यावेळी लगावला.