
फलटण शहरातील मध्यवर्ती भागातील व अत्यंत वर्दळीच्या उघड्या मारुती परिसरातील हुतात्मा स्मारकासमोरील व्यापाऱ्यास खंडणीची मागणी करत कोयता व तलवारीचा धाक दाखवून दोघांनी लुटले. हल्लेखोरांनी दुकानातील पैशांचा गल्लाच उचलून नेला. यावेळी अटकाव करणाऱ्या व्यापाऱ्याच्या डोक्यावर कोयत्याने वार केला असता व्यापाऱ्याने तो चुकावला; पण खांद्याला वार घासून गेल्याने व्यापारी किरकोळ जखमी झाला.
सातारा : फलटण शहरातील मध्यवर्ती भागातील व अत्यंत वर्दळीच्या उघड्या मारुती परिसरातील हुतात्मा स्मारकासमोरील व्यापाऱ्यास खंडणीची मागणी करत कोयता व तलवारीचा धाक दाखवून दोघांनी लुटले. हल्लेखोरांनी दुकानातील पैशांचा गल्लाच उचलून नेला. यावेळी अटकाव करणाऱ्या व्यापाऱ्याच्या डोक्यावर कोयत्याने वार केला असता व्यापाऱ्याने तो चुकावला; पण खांद्याला वार घासून गेल्याने व्यापारी किरकोळ जखमी झाला. अरिंजय दोशी (वय ७२) असे त्यांचे नाव आहे. शेजारील काही दुकानांतही कोयता आणि तलवारीचा धाक दाखवून खंडणीची मागणी करण्यात आली, तर बारामती चौकामधील जनरल स्टोअर्सच्या दुकानावर हल्लेखोरांनी खंडणीसाठी जोरदार दगडफेक केली. दरम्यान, अत्यंत वर्दळीच्या परिसरात रविवारी बाजारादिवशी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. व्यापाऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी की, शहरातील रविवार पेठेतील उघड्या मारुती मंदिर परिसरात जुनी बाजारपेठ आहे. या परिसरात नेहमी मोठी वर्दळ असते. रविवार बाजाराचा दिवस असल्याने ग्रामीण भागातील लोकांचीही या परिसरात दिवसभर मोठी गर्दी होती. या बाजारपेठेत हुतात्मा स्मारकासमोर सुहास रेडिमेड व मॅचिंग सेंटर नावाचे दुकान आहे. सायंकाळी पावणेसहा ते सहाच्या सुमारास दोन हल्लेखोर दुकानात घुसले.त्यापूर्वी एकाने शेजारील दुकानातील रुमाल हिसकावून तोंडाला बांधला होता, तर दुसऱ्याचा चेहरा स्पष्ट दिसत होता. एकाच्या हातामध्ये तलवार तर दुसऱ्याच्या हातात कोयता होता. दोघांनी हातातील हत्यारांचा धाक दाखवून अरिंजय दोशी यांच्याकडे दरमहा खंडणीची मागणी करीत गल्ला उघडून त्यातील रक्कम काढून घेतली.मालक अरिंजय दोशी यांनी हल्लेखाेरांनी अटकाव करताच त्यातील एकाने त्यांच्या डोक्यावर कोयत्याने वार करताच दोशी यांनी तो हुकविला. त्यामुळे तो कोयत्याचा वार खांद्याला घासून गेल्याने दोशी जखमी झाले.
अल्पवयीन मुलीला दमदाटी
दुकानातील दुसरा गल्ला हल्लेखोरांना उघडता न आल्याने ते गल्लाच उचलून बाहेर घेऊन गेले. काही अंतरावरील एका दुकानासमोर गल्ल्यातील नोटा घेत त्यातील चिल्लर व गल्ला तेथेच टाकून दिला. पडलेली चिल्लर एका अल्पवयीन मुलीने दोशी यांना आणून दिल्याने हल्लेखोरांनी मुलीसही दमदाटी केली. यानंतर हल्लेखोरांनी शेजारील दुकानांकडे मोर्चा वळवत तेथे खंडणीची मागणी केली.
दुकानावर जोरदार दगडफेक
दरम्यान, या घटनेपूर्वी हल्लेखोरांनी बारामती चौकामधील हिमालय जनरल स्टोअर्स या दुकानाच्या मालकाकडे खंडणीची मागणी करून दुकानावर जोरदार दगडफेक केली. त्याचबरोबर अन्य काही दुकानदारांनाही खंडणीची मागणी करीत शिवीगाळ केल्याची चर्चा आहे. घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.