‘हल्ली कोणाला भाषणाला बोलावण्याची भीती वाटते’; चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरुन अजित पवार नाराज

पुण्यामध्ये पार पडलेल्या आजच्या महायुतीच्या बैठकीमध्ये अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे.

    पुणे : लोकसभा निवडणूकीचे वारे देशभरामध्ये वाहत आहे. तिसऱ्या टप्प्यातील मतदान देखील पार पडले आहे. यामध्ये देशभराचे लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाचे देखील मतदान पार पडले आहे. मात्र बारामतीमध्ये यंदाच्या लोकसभा निवडणूकीमध्ये सर्वात कमी टक्के मतदान झाले आहे. मतदानाची टक्केवारी कमी झाल्यामुळे अजित पवार यांची चिंता वाढली आहे. पुण्यामध्ये पार पडलेल्या आजच्या महायुतीच्या बैठकीमध्ये अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे.

    पुण्याचे मतदान येत्या चौथ्या टप्प्यामध्ये पार पडणार आहे. त्यामुळे तीन दिवसांमध्ये प्रचाराचा तोफा थंडावणार आहेत. त्या अनुषंगाने अजित पवार यांनी महायुतीच्या पुण्यातील सभेला हजेरी लावली. बारामतीमध्ये कमी मतदान झाल्यानंतर हल्ली कोणाला भाषणाला बोलवण्याची देखील भीती वाटते अशा शब्दांत अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली. या बैठकीमध्ये चंद्रकांत पाटील देखील उपस्थित होते. बारामतीमध्ये कमी टक्के मतदान झाल्याने अजित पवार यांनी खंत बोलून दाखवली आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी बारामतीमध्ये केलेले भाषण अजित पवार यांना आवडलेले नसून त्यांनी नाराजीचा सूर व्यक्त केला आहे.

    काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?

    बारामती लोकसभा मतदारसंघाची यंदाची निवडणूक अत्यंत संवेदनशील होती. पवार कुटुंबातील दोन्ही उमेदवार असल्यामुळे चुरशीचा सामना होता. त्याचबरोबर भावनिक आवाहन देखील मतदारांना केले जात होते. अजित पवार यांच्या राजकीय भविष्यासाठी यंदाची बारामती लोकसभा निवडणूक निर्णायक ठरणार आहे. बारामतीमधील पत्रकार परिषदेमध्ये चंद्रकांत पाटील यांनी वादग्रस्त विधान केले. चंद्रकांत पाटील म्हणाले होते की, शरद पवार यांचा पराभव आम्हाला जास्त वजनदार वाटतो. राज्यात 2019 मध्ये शरद पवारांनी शिवसेनेला बाहेर काढून राज्याला फसविले. पीएम मोदी यांची देखील त्यांनी फसवणूक केली. आता संधी मिळाली आहे. मला आणि माझ्या कार्यकर्त्यांना शरद पवार यांचा पराभव करायचा आहे, इतना काफी है… बाकीच्या गोष्टी कमी महत्त्वाच्या आहेत. असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी बारामतीमध्ये केले होते.