भुजबळांच्या भाजप प्रवेशावर फडणवीसांची प्रतिक्रिया; ‘अंजली दमानिया सुप्रिया सुळेंच्या संपर्कात..’

भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी शरद पवार गटातील नेत्यांवर निशाणा साधला आहे.

    नागपूर : राष्ट्रवादी (NCP) अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal ) यांच्या नाराजीची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे. छगन भुजबळ हे भाजपच्या(BJP) वाटेवर आहेत असे वक्तव्य सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन केले. यामुळे चर्चांना उधाण आले असून यावर आता भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी शरद पवार (Sharad Pawar) गटातील नेत्यांवर निशाणा साधला आहे.

    छगन भुजबळ हे अजित पवार यांची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेवर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आमच्या पक्षाचे निर्णय आम्हीच घेत असतो, अंजली दमानिया आमचे निर्णय घेत नाहीत. अंजली दमानिया अलीकडच्या काळात सुप्रिया सुळेंच्या अधिक संपर्कात आहेत, त्यामुळे त्या अशा पोस्ट टाकत असतील. पण छगन भुजबळ त्यांच्या पक्षात आहेत, आम्ही आमच्या पक्षात आहोत, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.

    त्याचबरोबर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील भुजबळ यांच्या भाजप प्रवेशावर प्रतिक्रिया दिली. बावनकुळे म्हणाले, “अंजली दमानिया यांना एवढंच सांगेन की, छगन भुजबळ भाजपच्या संपर्कात नाहीत. त्यांनी स्वतः भाजपमध्ये येण्याची कधी इच्छा व्यक्त केलेली नाही आणि ते कधी भाजपमध्ये येणारही नाहीत. चुकीच्या बातमी पसरवणे योग्य नाही, असे स्पष्ट मत चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडले आहे.