देवेंद्र फडणवीसांनी नाकारलं शरद पवारांचं आमंत्रण; सांगितले ‘हे’ कारण

बारामतीमध्ये शरद पवार यांचे निवासस्थान असल्यामुळे त्यांना जेवणाचे आमंत्रण देण्यात आले होते. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहित शरद पवार यांच्या आमंत्रणाला विनम्रपणे नकार कळवला आहे.

    बारामती – बारामतीमध्ये ‘नमो रोजगार मेळावा’ पार पडणार आहे. यासाठी बारामतीमध्ये येणा ऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जेवणाचे आमंत्रण दिले होते. बारामतीमध्ये शरद पवार यांचे निवासस्थान असल्यामुळे त्यांना जेवणाचे आमंत्रण देण्यात आले होते. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहित शरद पवार यांच्या आमंत्रणाला विनम्रपणे नकार कळवला आहे.

    येत्या शनिवारी 2 मार्च रोजी बारामतीमध्ये नमो रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आले आहे. जेष्ठ नेते शरद पवार यांनी महायुतीमधील नेत्यांना जेवणाचे आमंत्रण दिल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले होते. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी व्यस्ततेचे कारण देत निमंत्रणाला नकार दिला आहे. व्यस्त कार्यक्रमांमुळे आपण या जेवणासाठी हजर राहू शकणार नाही असं देवेंद्र फडणवीसांनी नम्रपणे सांगितलं आहे. याबाबत त्यांनी पत्र देखील लिहिले आहे.

     काय लिहिले आहे पत्रात ?

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना पत्र लिहून विन्रमतेने नकार कळावला आहे. पत्रामध्ये लिहिले आहे की, आपले पत्र मिळाले. भोजनासाठी आपण निमंत्रित केल्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे. आपण जाणताच की, उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या पुढाकारातून बारामती येथे नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. बारामतीतील भरगच्च कार्यक्रम लक्षात घेता आणि तदनंतर वढू बुद्रुक आणि तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकांचे भूमिपूजन, त्यानंतर लगेचच आद्य क्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाचे भूमिपूजन असे आणखी दोन मोठे कार्यक्रम लागोपाठ असल्याने उद्याचा संपूर्ण दिवस अत्यंत व्यस्ततेचा असणार आहे. त्यामुळे आपल्या आग्रही निमंत्रणाला मान देणे यावेळी तरी शक्य होणार नाही. असे स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना दिले आहे.